सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून लाईक्सची मागणी करत तरुणाची आत्महत्या

जळगाव : ‘हॅलो गाइज, मै सुसाईड कर रहा हु, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ असा व्हिडीओ स्वत: तयार करुन तो सोशल मीडियावर टाकून एका तरुणाने गळफास घेतल्याची घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी उघडकीस आली. धीरज शिवाजी काळे (वय २२, रा. हरीविठ्ठलनगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, धीरज त्याच्या वडिलांसोबत स्टेट बँक कॉलनी येथे एका बंगल्यात फर्निचर काम करण्यासाठी गेला होता. थोडावेळ काम केल्यानंतर तो या घरातून बाहेर पडला. वडील मात्र दुसर्‍या एका खोलीत काम करत होते. दुपारच्या सुमारास जेवणासाठी वडिलांनी त्याला आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न आल्यामुळे वडिलांनी शोध सुरू केला. या दरम्यान धीरजने इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. काही वेळाने सर्वांना ही बाब समजली. त्यांनी धीरजला रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. धीरजने आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर टाकत आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते. त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.