स्वतःच्याच डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

धुळे : २४ वर्षीय तरुणाने स्वत:वरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शिरपूर शहरातील रामसिंगनगर येथे घडली. हर्षल भिका माळी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याने बुधवारी रात्री उशिरा राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी झाडून घेतली.

सविस्तर वृत्त असे की, शिरपूर शहरातील रामसिंगनगर येथे राहणार्‍या हर्षल माळी (वय २४) याने रात्री घरात झालेल्या किरकोळ वादातून स्वतःच्याच डोक्यात गावठी कट्टयातील गोळी झाडून घेत जीवन संपवले. या घटनेने शहरासह रामसिंगनगर परिसरात खळबळ उडाली आहे. हर्षलला त्याचे वडील भिका माळी यांनी उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हर्षलकडे गावठी कट्टा, काडतूस कुठून आला, याचा तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.