वॉट्सअँपवर आक्षेपार्ह धर्मांध मेसेज पाठवला म्हणून कारवाई

नंदुरबार : व्हॉट्सअप ग्रुपवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जातील व दोन धर्मात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्वरूपाचा संदेश प्रसारीत केला, म्हणून नंदुरबार शहरातील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांचेकडून नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येते. तरी देखील गुरूवारी (दि.28) रात्री ८ वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील व्यापारी राकेश कुंजबिहारी शाह याने व्हॉट्सॲप ग्रुपवर विशिष्ट एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या जातील व दोन धर्मात तेढ निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा स्वरूपाचा संदेश प्रसारीत केला.

पोलिसांनी या प्रसारित माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सायबर सेलला कठोर कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्‍यानुसार राकेश कुंजबिहारी शाहला ताब्यात घेऊन मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्या विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात करण्यात आली आहे.