अंबरनाथ : मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिलांशी संबंधित गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांचा विनयभंग, त्यांच्यावर अतिप्रसंग, दिवसाढवळ्या लोकांच्या गर्दीत महिलांची, तरुणींची छेड काढणे यांसारख्या घटना सर्रास घडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता अंबरनाथ येथील रेल्वे स्थानकानजीकच्या पुलावरून जाताना एक तरुणीवर हल्ला करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेसोबत असलेल्या तरुणानेच धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 03 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दिवसाढवळ्या लोकवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना नेमकी कोणत्या वादातून घडली? याबाबतचे कोणतेही कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. (Ambernath Crime young woman was killed with sharp weapon on bridge near railway)
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ येथील बारकूपाडा येथे राहणारी महिला ही अंबरनाथ पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरून जात होती. यावेळी तिच्यासोबत एक तरुण सुद्धा होता. दुपारी 03 वाजताच्या सुमारास ही तरुणी त्या पुलावरून जात असताना तिचा सोबत असलेल्या तरुणासोबत वाद झाला. याचवेळी त्या आरोपी तरुणाने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी तिच्या बचावासाठी काही वृद्ध पुढे आले. परंतु, आरोपीने तिच्यावर वार सुरूच ठेवले. यावेळी महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली. या घटनेची माहिती काही नागरिकांनी अंबरनाथ पोलिसांनी दिली. तर गंभीर जखमी झालेल्या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
हेही वाचा… Mumbai Crime : मुंबई असुरक्षित? वांद्रे टर्मिनस येथे एक्स्प्रेसमध्ये महिलेवर अतिप्रसंग
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्यानंतर लगेचच हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले. स्मिता कांबळे असे या महिलेचे नाव असून राहुल भिंगारकर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने तरुणाला काही पैसे उसने दिले होते, त्यामुळे ते पैसे पुन्हा हवे असल्याचा तगादा महिलेने लावला होता. त्यामुळे या वादातून तरुणाने महिलेच्या पोटात चाकू भोसकून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे, स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला आणि आरोपी तरुणाचे प्रेमसंबंध होते. ही महिला विवाहित होती. पण नवऱ्यापासून विभक्त राहात असल्याने तिने तरुणाकडे लग्न करण्याचा तगादा लावला होता. ज्या वादातूनच आरोपी तरुणाने महिलेची हत्या केली. त्यामुळे नेमके कारण अद्यापही समोर आलेले नाही.