कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी वाद, गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील मांढरे येथे गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी मानपानावरून दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने एकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काठी आणि दगडाने मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 5 जण जखमी झाले असून पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे.

पांढरे गावात हनुमान तरुण मित्र मंडळाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ महाप्रसादासाठी आले होते. पहिल्या पंगतीला सुरुवात करण्याआधी अध्यक्षांनी फेटा बांधून पाणी घालण्याची प्रथा आहे. यावेळी अध्यक्षांच्या एवजी दुसऱ्याच व्यक्तीने पाणी घातले. यावर एका गटाने आक्षेप घेतल्यानंतर वाद सुरू झाला.

यानंतर दोन गटातील काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर गावातील प्रमुखांनी सामजस्याने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गटात हाणामारी सुरू झाली. यातच अभिजित सुरेश पाटील यांने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर काठी आणि दगडाने दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर करवीर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी 10 जणांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी तक्रार दाखल केलेल्या उदय सोनबा पाटील यांच्यासह 5 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गोळीबारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाली असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.