ठाणे पोलीस दलात कार्यरत एका महिला पोलीस कर्मचार्यावर तिच्या पतीला सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पूजाअर्चा करण्याच्या बहाण्याने ५ जणांच्या भोंदूबाबांच्या टोळीने गेल्या ५ वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पाचही भोंदूबाबांना अटक करण्यात आली आहे.
तलासरी तालुक्यात राहणारी पीडित महिला सध्या ठाणे पोलीस दलात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. तिच्या नवर्याला सरकारी नोकरी लावण्याच्या आणि घरगुती समस्या दूर करण्यासाठी ५ जणांच्या भोंदूबाबांच्या टोळीने तिच्या तलासरी तालुक्यातील घरात पूजा विधी केली. त्यानंतर पंचामृतमध्ये गुंगीचे औषध पाजून रविंद्र नारायण भाटे (रा. जोखीम चाळ, कांजूरमार्ग, मुंबई) याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर अद्याप पूजा अर्चा करावयाची असल्याचे सांगत रविंद्र भाटे याच्यासह त्याचे साथिदार दिलीप गोविंद गायकवाड (रा. पोखरण, ठाणे), गौरव संतोष साळवी (रा. खोपट, ठाणे) यांनी पीडितेवर अनेकदा वेगवेगळ्या जागी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते.
या टोळीने पीडितेला कांदीवली येथील एका मठात बोलावून अघोरी पूजा केल्यानंतर बलात्कार केला होता. तसेच अघोरी पूजेच्या नावाखाली लोणावळा येथे नेऊन तिथेही बलात्कार केला होता. अघोरी पूजेसाठी खर्च म्हणून रविंद्र भाटे, दिलीप गायकवाड, गौरव साळवी यांच्यासह महेंद्र कुमावत (रा. काल्हेर, भिवंडी आणि गणेश कदम (रा. काल्हेर, भिवंडी) यांनी पीडितेकडून २ लाख १० हजार रुपये घेतले होते. भोंदूबाबांच्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर तलासरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानंतर तलासरी पोलिसांनी बलात्कार, महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक केली आहे.