उत्तर प्रदेश : मेरठमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच हे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले आहे. कारण त्यांच्या घराला बाहेरून कुलूप होते आणि ज्याप्रकारे सर्वांचे मृतदेह आढळले आहेत, हे पाहून मारेकरी पाचही जणांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. शहरातील लिसाडी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील सोहेल गार्डन परिसरात संबंधित घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घराबाहेर लोकांनी गर्दी केली होती. (Bodies of five members of the same family found in a house in Meerut)
मिळालेल्या माहितीनुसार, मोईन आणि आस्मा पती-पत्नी, तर अफशा (8), अजीजा (4) आणि अदिबा (1) अशी मृतांची नावे आहेत. मृत मोईन हा मेकॅनिक म्हणून काम करत होता. बुधवारी (8 जानेवारी) संध्याकाळपासून हे कुटुंब बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळपासून नातेवाईक आणि मृतकाचा भाऊ फोन करत होते, पण फोन उचलला जात नव्हता, तसेच शेजाऱ्यानीही हत्या झालेल्या कुटुंबाला दिवसभर पाहिले नव्हते. जेव्हा मोईनचा भाऊ त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा घराला बाहेरून कुलूप असल्याचे त्याने पाहिले. यानंतर त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच सर्व पोलिस अधिकारी एडीजी डीजे ठाकूर, डीआयजी कलानिधी नैथानी, एसएसपी विपिन ताडा आणि जिल्हा दंडाधिकारी दीपक मीणा हे देखील घटनास्थळी पोहोचले. यानंतर काही पोलीस छतावरून घराच्या आत शिरले तर काही पोलिसांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत गेले. घरात प्रवेश केल्यानंतर मोईन आणि आस्माचा हायपाय बांधलेला मृतदेह आढळून आला, तसेच खोलीत रक्तही पसरले होते. यानंतर पोलिसांनी मृलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बेडच्या आत सामान ठेवण्यासाठी बनवण्यात आलेल्या जागेत तिन्ही मुलींचे मृतदेह आढळून आले. सर्वात लहान मुलीचा मृतदेह गोणीमध्ये होता. ही घटना शत्रुत्वातून घडल्याचे दिसून येत असून या घटनेमागे कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा हात असू शकतो, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा – Pune Crime News : पुण्यात बीपीओ कंपनीत तरुणीवर धारदार चाकूने वार करणारा म्हणतो, मला तिला मारायचे नव्हते…
मोईनचे तिसरे तर आस्माचे दुसरे लग्न होते
मोईनच्या नातेवाईकाने सांगितले की, मोईनचे कुटुंब मूळचे मेरठमधील किथोर शाहजहानपूर येथील असून सध्या तो रुरकी येथे राहत होता. दीड महिन्यांपूर्वीच तो त्याच्या कुटुंबासह मेरठला राहण्यासाठी आला होता. मोईनचे हे तिसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न 15 वर्षांपूर्वी झाले होते आणि त्याला एक मुलगी आहे. परंतु पहिली पत्नी वारल्यानंतर मोईनची मुलगी त्याच्या बहिणीसोबत राहू लागली. यानंतर, मोईनने दुसरे लग्न केले, मात्र काही काळानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 10 वर्षांपूर्वी मोईनने आस्माशी तिसरे लग्न केले. आस्माचाही पहिला घटस्फोट झाला होता. यानंतर मोईन आणि आस्मा दोघेही आनंदात होते आणि त्यांना तीन मुली होत्या.
नवीन घराचे स्वप्न पाहत असतानाच कुटुंबाची हत्या
दरम्यान, मृत मोईनने याच भागात नवीन घर विकत घेतले होते. नवीन घराचे काम पूर्ण होईपर्यंत मोईन आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होता. गेल्या मंगळवारीच घराचे काम पूर्ण झाल्याच्या आनंदात आस्माने सर्वांना लाडू वाटले होते. मात्र त्यांच्या आनंदाला कोणाची तरी दृष्ट लागली. नवीन घरात जाण्याआधीच संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली.