बॉलीवूडमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या ड्रग्ज तस्कराला अटक

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी बोरिवली येथे गुन्हे शाखेची कारवाई

Arrested

एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी बॉलीवूडच्या एका सहाय्यक मेकअपमनच्या सहकार्‍यासह दोघांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी बोरिवली परिसरातून अटक केली. परवेज ऊर्फ लड्डू हनीफ हलाई आणि निकेतन ऊर्फ निखील ऊर्फ गोलू सुरेश जाधव अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १०५ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोरिवलीतील राजेंद्रनगर, दत्तपाडा रोडवर गुरुवारी गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी गस्त घालत होते, यावेळी पोलिसांना पाहताच दोन तरुण पळू लागले. या दोघांवर संशय येताच पळून जाणार्‍या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना १०२ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत तीन लाख पंधरा हजार रुपये आहे. चौकशीत ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह बोगस दस्तावेज बनवून फसवणूक करणे, गंभीर दुखापत, घरफोडीसारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

यातील एक आरोपी अलीकडेच जामिनावर बाहेर आला होता. त्याने एका सहाय्यक मेकअपमनकडे काम करण्यास सुरु केले. याच ठिकाणी वेगवेगळ्या मोठ्या प्रोडेक्शन हाऊस, बॅनर्स, रियालिटी शोमध्ये त्याला सिनेकलाकार, नामांकित अभिनेत्यांचे मेकअप, हेअर ड्रेसिंगची कामे करण्याची संधी मिळाली होती. तिथे काम करताना त्याने ड्रग्ज तस्करी करण्यास सुरुवात केली होती. या व्यवसायात अमाप पैसे मिळत असल्याने तो एमडी ड्रग्जची विक्री करु लागला होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून तो ड्रग्ज तस्करीत सक्रिय असल्याचे पोलिसांनी सांगितले.