सोशल मिडीयावर माजी प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल, नातेवाईक प्रियकराला अटक

तक्रारदार 19 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिल आणि दोन भावांसोबत सांताक्रुझ येथील गोळीबार परिसरात राहते. ती सध्या नर्सचे काम करीत असून गणेश हा तिच्या चुलतमामाचा मुलगा आहे.

सोशल मिडीयावर माजी प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी नातेवाईक असलेल्या प्रियकराला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. गणेश असे या प्रियकराचे नाव असून त्याला वांद्रे कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार 19 वर्षीय तरुणी तिच्या आई-वडिल आणि दोन भावांसोबत सांताक्रुझ येथील गोळीबार परिसरात राहते. ती सध्या नर्सचे काम करीत असून गणेश हा तिच्या चुलतमामाचा मुलगा आहे. मूळचा उत्तर प्रदेशच्या जौनपूरचा रहिवाशी असलेला गणेश हा अंधेरीतील एमआयडीसी परिसरात राहतो. चार वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध होते. यावेळी तिने तिचे काही खाजगी फोटो गणेशला पाठविले होते. गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबियांना समजली होती. या प्रेमसंबंधाला त्यांच्या घरच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यातील संबंध तोडून टाकले होते. मार्च महिन्यात गणेशने सोशल मिडीयावर तिचे काही अश्लील फोटो व्हायरल केले होते. हा प्रकार तिच्या मैत्रिणीच्या लक्षात येताच तिने त्याचे स्क्रिनशॉट काढून तिला दाखविले. ते फोटो तिने गणेशला पाठविले होते.  तिने हा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला होता. त्यानंतर त्यांनी निर्मलनगर पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करणे, मोबाईलमधील फोटो डिलीट करुन पुरावा नष्ट करणे तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याने विशेष सेशन कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र त्याची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. त्यानंतर गणेशला रविवारी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमधील तिचे सर्व फोटो त्याने डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तो मोबाईल फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.