पनवेल : माणुसकीला काळीमा फासणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. एका वृद्धेवर तीन दिवसांपूर्वी एक युवकाने अत्याचार केला होता. याचा निषेध करून या तरुणाला फाशी द्यावी, या मागणीसाठी माणगाव तालुक्यातील निजामपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. वृद्धेवरील अत्याचारामुळे तालुक्यातील लोक चिडले आहेत.
माणगाव तालुक्यातील निजामपूरमधील एका वृद्धेवर 18 वर्षांच्या तरुणाने अत्याचार केला होता. जुलै ते 19 डिसेंबर या कालावधीत या तरुणाने अनेकवेळा या महिलेवर अत्याचार केले. 19 डिसेंबर रोजी वृद्धेने विरोध केला तेव्हा त्याने वृद्धेला जमिनीवर आपटले आणि मारहाण केली. त्यानंतर याविरोधात तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी 20 डिसेंबर रोजी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तालुक्यात ठिकठिकाणी महिलेवरील अत्याचाऱ्याच्या घटनेचा निषेध केला जात आहे. रविवारी काढलेल्या मोर्चात सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि महिलांचा समावेश होता.
हेही वाचा… Navi Mumbai News : स्वच्छतेसाठी 6 हजार नवी मुंबईकर धावले, सुजाता माने आणि अक्षय पडवळ विजयी
आरोपीला फाशी द्या, आजीला न्याय द्या अशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला होता. पीडित महिलेच्या घरापासून निजामपूर बाजारपेठ, सोमजाई मंदिर, श्रीराम मंदिर असा मोर्चा होता. या अत्याचाराविरोधात माणगाव तालुक्यातील वातावरण तापले आहे. रोज ठिकठिकाणी निषेध केले जात आहेत. या प्रकरणी आरोपीला फाशी द्या, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने आंदोलनाची दखल घ्यावी आणि आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली.
(Edited by Avinash Chandane)