Homeक्राइमCrime : तब्बल 34 वर्षांनंतर फरार आरोपी जेरबंद, कुठे लपला होता बाबू...

Crime : तब्बल 34 वर्षांनंतर फरार आरोपी जेरबंद, कुठे लपला होता बाबू काळे

Subscribe

पनवेल : पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल 34 वर्षांनंतर सोमवारी (23 डिसेंबर) अटक करण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे. बाबू गुडगीराम काळे असे या आरोपीचे नाव आहे. किरकोळ भांडणातून त्यांनी पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. ही घटना आहे 28 जानेवारी 1991 रोजीची. त्यानंतर पत्नीला उपचारासाठी सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या घटनेनंतर बाबू काळे फरार झाला होता. तर पत्नीच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बाबू काळे याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. मात्र रागाच्या भरात त्यांने थेट पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जाळले. हे प्रकरण अंगाशी येईल हे लक्षात आल्यानंतर त्याने पळ काढला आणि स्वत:ची ओळख लपवली. दरम्यान आरोपी बाबू काळे याला अटक करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायालयाने वॉरंट काढले होते. त्यानंतर शोध घेतला असता बाबू काळे मुलुंडमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुलुंडमध्ये तपास केल्यावर तो सेलू, परभणीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

हेही वाचा… Crime : वाहतूक कोंडीच्या वादातून स्थानिक नेत्यावर चाकूहल्ला, आरोपीला तात्काळ अटक

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह पथक परभणीला गेले असता त्यांना बाबूचा मोबाईल नंबर मिळाला. मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या आधारे बाबू गुडगीराम काळे याला सोमवारी अटक केली. कोर्टाने त्याला 3 जानेवारी 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आरोपीचे वय 70 आहे.

हेही वाचा…  Santosh Deshmukh Murder : वाल्मिक कराडवर एकट्या परळीत 23 गुन्हे तरीही मोकाटच…दमानिया आक्रमक

पोलीस आयुक्त मिलीद भारंबे, सह आयुक्‍त संजय येनपुरे, उपायुक्त रश्मी मांदेडकर (परिमंडळ 2), सहाय्यक पोलीस आयुक्‍त अथोक राजपुत (पनवेल विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार अमोल पाटील, संदेश म्हात्रे, महेश पाटील, तुषार बोरसे, अविनाश गंथडे, मियुन भोसले, कॉन्स्टेबल विशाल दुधे, किरण कराड यांनी या प्रकरणाचा छडा लावला.

(Edited by Avinash Chandane)