कर्जत : एका किरकोळ वादातून मराठा समाजाचे नेते अनिल भोसले यांच्यावर कर्जत तालुक्यात चाकू हल्ला झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आणि मराठा समाज आक्रमक झाला. मात्र, घटनेचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीला अटक केली. त्यामुळे कुठलाही तणाव निर्माण झाला नाही.
अनिल भोसले हे मराठा समाजाचे नेते असून ते रविवारी (22 डिसेंबर) सालवड येथे लग्न समारंभातून परतत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळील चिंचवली रेल्वे गेटजवळ वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत चिंचवली येथील मनीष भगत यांचीही गाडी अडकली होती. वाहतूक कोंडीतून गाडी काढताना अनिल भोसले आणि मनीष भगत यांच्यात शाब्दिक वाद झाला. याचा राग येऊन मनीष भगत यांनी थेट भोसले यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यावेळी भगत यांच्यासोबत आणखी चौघे होते. भगत यांनी भोसले यांच्यावर चाकूहल्ला केल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. तशी जखमी अवस्थेत जीव वाचवून गाडी चालवत त्यांनी घर गाठले.
हेही वाचा… Raigad Politics : पालकमंत्रीपदासाठी रायगडमध्ये बॅनरबाजी, एक फिक्स पालकमंत्री, दुसरा भावी पालकमंत्री
मात्र, सुडाने पेटलेला मनीष भगत आणि त्यांच्या साथीदारांनी भोसले यांचा पाठलाग केला. रात्री ही घटना घडल्याने भोसले यांचे कुटुंबीय घाबरले होते. जखमी भोसले यांना प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे आणि इतर अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपी मनीष घरत याला रात्री उशिरा ताब्यात घेतले आणि नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर जखमी भोसले यांना अधिक उपचारासाठी पनवेलमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरा मराठा समाज बांधव भोसले यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात जमले होते.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंचावरील घटना ताजी असताना आता कर्जत तालुक्यातून हे प्रकरण वेगळे वळण घेऊ नये म्हणून पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. दरम्यान अनिल भोसले यांच्यावरील हल्ल्यानंतर कर्जत सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. टेळे यांची भेट घेतली आहे.
(Edited by Avinash Chandane)