अलिबाग : महिला आणि अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांमुळे महाराष्ट्राची मान रोज शरमेने खाली जात आहे. बदलापूर, कल्याण, पुण्यानंतर आता रायगडमधील मुरुडमधील लज्जास्पद घटनेमुळे राज्यात संतापाची लाट पसरली आहे. मुरुड तालुक्यातील सात वर्षांच्या मुलीवरील लैंगिक अत्याचाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मुरुड तालुक्यातील एका २२ वर्षांच्या नराधमाने सात वर्षीय चिमुरडीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि तेवढाच लाजीरवाणा प्रकार उघड झाला आहे. यातील आरोपीला पोलिसांनी शनिवारी (28 डिसेंबर) अटक केली आहे. या नराधमाने जवळच समुद्रकिनारी नेऊन चिमुरडीवर अत्याचार केला. हा प्रकार कळताच पीडित बालिकेच्या आईने रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. ही घटना शुक्रवारी (27 डिसेंबर) घडली. पीडित मुलगी आणि भाऊ बाहेर शौचाला गेले होते. आरोपीने लहान मुलगी पाहून किनारी असलेल्या बोटीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर तिने हे कुणाला सांगू नये म्हणून तिला धमकीही दिली. तसेच कुणी हट्टाने विचारले तर होडीचा गळ गुप्तांगाला लागल्याचे सांग, असेही धमकावून तिला सांगितले होते.
हेही वाचा… Plane Crash : विमान प्रवाशांसाठी डिसेंबर ठरला घातक; एकाच महिन्यात 6 अपघात अन् 234 जणांचा मृत्यू
या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी मुरुडचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवून पीडित मुलीची चौकशी करण्याची सूचना केली आहे. तर या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी सामजिक कार्यकर्ती रुपाली पेरेकर यांनी केली आहे.
दरम्यान, हे लज्जास्पद कृत्य करून नराधम घरात माळ्यावर लपून बसला होता. पोलीस निरीक्षक नामदे बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एम. टी. शिंदे यांच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले. राज्यात महिलांवरील, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत राज्याने कठोर कायदा बनवावा, अशी मागणी होत आहे.
(Edited by Avinash Chandane)