Video : पोलीस भरती परीक्षेतील ‘हायटेक कॉपी’ प्रकरणी मुन्नाभाईला जळगावमध्ये अटक

crime news jalgaon one arrested while copying munnabhai style in police recruitment exam
पोलीस भरती परीक्षेतील 'हायटेक कॉपी' प्रकरणी मुन्नाभाईला जळगावमध्ये अटक

जळगावात पोलीस भरती प्रक्रिया परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुन्नाभाई हे आरोपीचे नाव आहे का? असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण तसे नसून मुन्नाभाई चित्रपटातील अभिनेता संजय दत्त ज्याप्रकारे कॉपी करुन वैद्यकीय परीक्षा पास झाला. त्याच काहीशा पद्धतीने या आरोपीने पोलीस भरती प्रक्रिया परीक्षा देण्याची योजना आखली होती. आरोपीने पायाच्या नी-क्यॅपमध्ये आणि कानात एक डिव्हाइस लपवून ठेवले होते. ज्यामाध्यमातून तो परीक्षेतील उत्तरे सोडवत होता. मात्र परीक्षा केंद्रावरील पोलिसांच्या वेळीच हा गैरप्रकार उघडकीस आल्याने आरोपीला अटक करण्यात आली.

अधिक माहितीनुसार, जळगावमधील वाघ नगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर शनिवारी पोलीस भरती प्रक्रिया लेखी परीक्षा सुरु होती. परीक्षा सुरु होण्याआधी काही मिनिटे अगोदर एक उमेदवार दोन ते तीन वेळा लघु शंकेचं कारण सांगून बाहेर आला. मात्र पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. त्यामुळे त्याच्या अंगाची झडती घेण्यात आली. उमेदवाराने नी-क्यॅपमध्ये एक डेबिट कार्डप्रमाणे दिसणारे डिव्हाईस आणि कानात एक छोटे डिव्हाईस लपवल्याचे उघडकीस आले. हे डिव्हाईस कानात अशापद्धतीने लपवण्यात आलं होतं की ते कोणालाही सहज दिसले नसते. हे कानातील डिव्हाईस ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनाही अधिक मेहनत घ्य़ावी लागली.

या डिव्हाईसच्या माध्यमातून हा उमेदवार बाहेरुन मदत घेत लेखी परीक्षा देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी या आरोपी उमेदवाराला रोखत पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार केल्याप्रकरणी त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार करणारा मुन्नाभाई पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.