Homeक्राइमCrime : महाडमध्ये सहलीसाठी आली, प्रियकरासोबत पळाली अन् अलिबागमध्ये पैशाच्या वादातून हत्या

Crime : महाडमध्ये सहलीसाठी आली, प्रियकरासोबत पळाली अन् अलिबागमध्ये पैशाच्या वादातून हत्या

Subscribe

अलिबाग : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमधून रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या शैक्षणिक सहलीमधील एक विद्यार्थिनी प्रियकराबरोबर पळून जाण्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये घडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या युवक जामनेरहून सहलीच्या बसमागून मोटरसायकलने आला होता.

जामनेरहून आलेल्या सहलीतील विद्यार्थिनी रायगडावरून खाली उतरल्यानंतर परतताना एक विद्यार्थिनी गाडीमध्ये कमी असल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले. यामुळे शिक्षक घाबरून गेले होते. त्या विद्यार्थिनीने सोबत असलेल्या मैत्रिणींना तुम्ही पुढे व्हा मी मागून येते, असे सांगितले होते. ही माहिती शिक्षकांनी पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी शोध घेणे सुरू केले असता येथील खर्डी गावाजवळ ही विद्यार्थिनी एका तरुणाबरोबर दुचाकीवरून गेल्याचे कळले. यावरून पोलिसांनी शोध घेतला असता जामनेरमधील 19 वर्षांच्या प्रियकराबरोबर ही विद्यार्थिनी गेल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा…  Crime : याची हिंमत तर पाहा, दोन लग्न करून तिसरीसोबत फोडली लग्नाची सुपारी, नेरळ पोलिसांकडून बेड्या

हा युवक सहलीच्या बसपाठोपाठ जामनेरहून किल्ले रायगडपर्यंत आला होता. चित्ता दरवाजा येथून विद्यार्थिनीला पुण्याच्या दिशेने जात असताना मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत महाड तालुका पोलिसांनी या युवकावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

अलिबागमध्ये पैशाच्या वादातून तरुणाची हत्या

उसने दिलेले पैसे वसूल करण्यावरून एका तरुणाची हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार अलिबाग तालुक्यात उघड झाला आहे. कातळपाडा गावातील अमित प्रफुल्ल वाघ (37) याची गळा दाबून हत्या करण्यात आली. या प्रकरणी चंद्रकांत टिळक म्हात्रे आणि अक्षय नारायण म्हात्रे यांना गुरुवारी (12 डिसेंबर) अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (11डिसेंबर) घडली.

अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथील अमित वाघ याने कोपरी-कुर्डूस येथील एकाकडून उसने पैसे घेतले होते. पैसे परत न दिल्याने चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे बुधवारी रात्री अमितच्या घरी गेले आणि पैसे परत करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला आणि तो विकोपाला गेला. दोघांनी अमितला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला मारहाण केली. एवढेच नाही तर अमितला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचून आणले आणि चंद्रकांतने अमितचा गळा दाबला.

त्यानंतर अक्षयने त्याच्या गुप्त भागावर प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या अमितचा मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोयनाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवली. अखेर गुरुवारी सायंकाळी आरोपींना अटक केली. या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात चंद्रकांत म्हात्रे आणि अक्षय म्हात्रे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by Avinash Chandane)