अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी, माजी नोकरासह तिघांना अटक

या तिघांनी तक्रारदार तरुणीचा अश्लील व्हिडीओ अनेकांना व्हॉटअपद्वारे व्हायरल केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.

Close up hand holding smart phone with Viral Video word and icons with notebook at background, Mobile technology concept

अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन एका 22 वर्षांच्या तरुणीची बदनामी करुन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच माजी नोकरासह तिघांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. रवीकुमार भागिरथी गुप्ता, शिवशंकर अमरनाथ विश्वकर्मा आणि अभिषेक अवघेश विश्वकर्मा अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर आरोपींनी कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या तिघांनी तक्रारदार तरुणीचा अश्लील व्हिडीओ अनेकांना व्हॉटअपद्वारे व्हायरल केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्यांचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. पिडीत तरुणी अंधेरी येथे घरकाम करते. तिचा प्रियकर बंगळुरूला राहत असून त्याला काही दिवसांपूर्वी तिने तिचे अश्लील व्हिडीओ पाठविले होते. तिथेच काम करणार्‍या रवीकुमारने तिचा अश्लील व्हिडीओ घेऊन ते व्हिडीओ त्याच्या दोन्ही आरोपी मित्रांना दिला होता. याच व्हिडीओची धमकी देऊन रवीकुमार तिला ब्लॅकमेल करीत होता. तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत होता. तिने त्याच्याशी संबंध ठेवले नाहीतर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता.

या प्रकारानंतर ती काम सोडून बंगळुरूला निघून गेली. एक महिन्यानंतर ती पुन्हा कामावर आली होती. यावेळी तिला रवीकुमारने तिचे अश्लील व्हिडीओ तिच्या परिचित काही लोकांना व्हायरल केल्याची माहिती समजली होती. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. गुन्हा नोंद होताच रवीकुमारसह शिवशंकर विश्वकर्मा आणि अवघेश विश्वकर्मा या तिघांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत रवीकुमारच्या इतर दोन्ही मित्रांचा सहभाग उघडकीस आला आहे.