पुणे : राज्यातील राजकारण ढवळून काढणारा ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात पुन्हा एका नवा खुलासा समोर आला आहे. ससून रुग्णालयात राहुनही तो ड्रग्जचे रॅकेट राजरोसपणे चालवत होता. रुग्णालयातच त्याला फाइव्ह स्टार सोईसुविधा पुरवल्या जात होत्या. हे सगळं मिळविण्यासाठी तो महिन्याकाठी तब्बल 17 लाख रुपये देत होता. यातून त्याच्याकडे किती संपत्ती असणार याचा अंदाजही सर्वसामान्य लावू शकणार नाहीत एवढे मात्र खरे. (Drug mafia Lalit Patil case Was he paying so much for five star facilities?)
सध्या अटकेत असलेला ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या चौकशीतून अचंबित करणारे खुलासे समोर येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे तो अटकेत असतानाही ससून रुग्णालयात राहून पंचतारांकीत हॉटेलमध्ये जशा सुविधा मिळतात अगदी तशाच सुविधा त्याला तेथे मिळत होत्या. यासाठी तो 17 लाख रुपये महिन्याला देत होता. परंतू या सगळ्या सुविधा त्याला पुरवत कोण होते? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.
वार्ड नंबर 16 तील पोलिसांना देत होता पैसे
मी पळालो नाही तर मला पळवून लावले,एवढेच नाही तर मी सगळ्यांची नावे सांगणार असे ललित पाटील पोलिसांच्या ताब्यात असताना म्हणाला होता. आता त्याच्याच चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ड्रग्जमाफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात कारागृहात होता. मात्र, तो उपचाराचे कारण देत रुग्णालयातच होता. या दरम्यान तो हवे तसे कुठेही फिरत होता. रुग्णालयातून हॉटेलमध्ये जात होता. त्यासाठी ललित पाटील महिन्याला 17 लाख रुपये देत होता. पोलीस तपासात ललित पाटील याने ही माहिती दिली. 16 नंबर वार्डात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तो पैसे देत होता हेसुद्धा आता उघड झाले आहे.
हेही वाचा : ‘त्याला’ नग्न करून नाचायला लावले अन् व्हिडीओही बनवला; पैशांसाठी मित्रच बनले शत्रू
महागड्या कारमधून करत होता पुणे सफारी
सध्या कारागृहात असलेला ड्रग्जमाफिया ललित पाटील याच्या चौकशीतून तो ससून रुग्णालयात असतानाच कारनामे उघड होत आहेत. त्या कारनाम्यामध्ये ललित हा महागड्या अशा इनोव्हा कारमधून शहरभर फिरत असे. त्याच्या मैत्रिणीसोबत मॉलमध्ये जाऊन खरेदीही करत असे. तर बिर्याणीचे पार्सल घेण्यासाठी तो कधीही बाहेर पडत असे. यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करणाऱ्या पोलिसांनाही धक्का बसला आहे.
हेही वाचा : Diwali 2023 : गावी जाणाऱ्या सर्वसामान्यांचे दिवाळे; खासगी बसपेक्षा विमान प्रवास स्वस्त
आतापर्यंत दहाहून अधिक पोलिसांचे निलंबन
ललित पाटील याचे हे कारनामे उघड होत असल्यामुळे त्याला मदत करणारे पोलीस कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दहा पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. परंतु बडतर्फीची कारवाई अजून कोणावर झाली नाही.