घराजवळ बदली देण्याचे आमिष दाखवून शिक्षकाचा शिक्षिकेवर बलात्कार

rape image
प्रातिनिधिक छायाचित्र

बोईसर येथील ३२ वर्षीय शिक्षिकेवर बदलीच्या आमिषाने बलात्कार करणार्‍या आरोपीला मोखाडा पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद सुरेश भांगरे असे त्याचे नाव असून तोही शिक्षक आहे. पीडित शिक्षिकेची गोंदे आश्रमशाळेत ऑगस्ट २०१९ ला बदली झाली होती. बोईसर येथून सेवेसाठी ये-जा करण्यात अडचणी येत होत्या. या संधीचा फायदा घेत येथील शिक्षक मिलिंद सुरेश भांगरे याने या शिक्षिकेला बदलीचे आमिष दाखवले. त्यानंतर मोखाड्यात आपल्या मित्राच्या रुमवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकीही तिला दिली. इतकेच नाही तर या महिलेच्या बोटातील दोन तोळ्याची अंगठीही जबरदस्तीने काढून घेतली होती.

शिक्षिकेने घडलेला सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर तिने मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून बलात्कारी शिक्षक मिलिंद सुरेश भांगरे याला मोखाडा पोलिसांनी बलात्कार, खुनाची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून महिलेला मारहाण

तर दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्याच्या रागातून एका महिलेला मारहाण केल्याची घटना मीरारोडच्या पेणकरपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पेणकरपाड्याच्या किसन नगर परिसरात राहणारे संदीप पवार यांनी घराजवळ दिनेश मोहिते या तरुणाला नशा करत असल्याने हटकले. त्यामुळे दिनेशने पवार यांना धक्काबुक्की केली. याबाबत पवार यांनी कशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मुलाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याच्या रागातून दिनेशची आई व वहिनीने पवार यांच्या पत्नीला धक्काबुक्की व शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यावेळी पवार यांच्या पत्नीचे मंगळसूत्र देखील चोरीस गेले. मारहाण केल्याप्रकरणी दिनेशची आई व वहिनी त्यांच्याविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.