Homeक्राइमFIITJEE Shutting Down : अडीच लाख फी घेतली अन् रातोरात क्लासेसला ठोकलं...

FIITJEE Shutting Down : अडीच लाख फी घेतली अन् रातोरात क्लासेसला ठोकलं टाळं, कारण काय?

Subscribe

FIITJEE चा टर्नओव्हर 542 कोटी रुपये इतका होता. असे असतानाही अचानक FIITJEE च्या केंद्रांना टाळे का लागले? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. 

नवी दिल्ली : FIITJEE हे IIT-JEE क्षेत्रातील मोठे नाव असल्याने इंजिनीयरींगची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेताना दिसतात. मात्र दिल्ली-एनसीआरसह देशातील पाच शहरांमधील FIITJEE क्लासेस रातोरात बंद झाले आहेत. लाखो रुपये फी भरल्यानंतर अचानक FIITJEE क्लासेसला टाळे लागल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणामुळे हजारो विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कोचिंग सेंटर बंद झाल्याची माहिती समजाच विद्यार्थी आणि पालकांची FIITJEE क्लासेसला गर्दी केली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर आता FIITJEE च्या मालकासह 11 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र रातोरात क्लासेस बंद का झाले? याचे कारण आता समोर येत आहे. (FIITJEE classes in five cities of the country including Delhi-NCR closed)

आयआयटी दिल्लीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेल्या डीके गोयल यांनी FIITJEE सुरुवात 1992 मध्ये दिल्लीतील एका छोट्या केंद्रातून केली. आयआयटी-जेईईच्या प्रवेश निवडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कोचिंग सेंटर सुरू केले होते. अनेक IIT टॉपर्स आणि FIITJEE मधील निवडींनी FIITJEE च्या यशात भर घातली आहे. त्यामुळे लोकप्रियता वाढल्यानंतर दिल्लीसह देशभरात FIITJEE ची 72 केंद्रे उघडण्यात आली. FIITJEE मध्ये प्रवेश हवा असल्यास अडीच लाख रुपये फी आकारली जाते. एका अहवालानुसार 2023 मध्ये FIITJEE चा टर्नओव्हर 542 कोटी रुपये इतका होता. असे असतानाही अचानक FIITJEE च्या केंद्रांना टाळे का लागले? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे.

हेही वाचा – SC Verdict : लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

शिक्षकांच्या अचानक राजीनाम्यामुळे केंद्र बंद करण्यात आली आहेत, परंतु लवकरच परिस्थिती सामान्य होईल, असे FIITJEE च्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र पालकांना व्यवस्थापनावर विश्वास नाही. त्यामुळे पालकांनी FIITJEE चे मालक डीके गोयल, सीएफओ राजीव बब्बर, सीओओ मनीष आनंद आणि ग्रेटर नोएडा शाखा प्रमुख रमेश बटलेश यांच्यासह एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आरोपींना नोटिसा बजावत उत्तर मागितले आहे. तसेच आरोपींनी समाधानकारक उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शिक्षकांनी राजीनामा देण्याचे कारण काय?

दरम्यान, FIITJEE च्या एका माजी शिक्षकाने सांगितले की, गेल्या एका वर्षात आम्हाला आमचा पगार वेळेवर मिळालेला नाही. तसेच पाच महिन्यांचे वेतन अद्यापही बाकी आहे. आम्ही व्यवस्थापनाकडे अनेक वेळा आमचा पगार मागितला आहे, पण त्यांच्याकडे कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे आम्हाला राजीनामा द्यावा लागला, अशी खंत माजी शिक्षकाने बोलून दाखवली आहे.

हेही वाचा – Delhi Crime : सूटकेसमध्ये सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघे गजाआड