नाशिकमधून चोरीला गेलेली फॉर्च्यूनर चित्तोडगडच्या नाकाबंदीत जप्त

पळसे गावानजीक नाशिक-पुणे महामार्गावरील त्रिमूर्ती प्लाझासमोरून गेली होती चोरीस

नाशिक : पळसे येथील त्रिमूर्ती प्लाझा समोरून चोरीला गेलेली फॉर्च्यूनर गाडी काही तासांत राज्यस्थानमधील चित्तोडगड येथील रस्त्यावरील नाकाबंदी दरम्यान राज्यस्थान पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नाशिकरोड पोलिसांचे पथक ही गाडी ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पांडुरंग संपत एखंडे (रा. पळसे, ता. जि.नाशिक) यांच्या मालकीची ही फॉर्च्यूनर गाडी (एमएच१५ जीवाय ७१७१) नाशिक-पुणे महामार्गालगत असलेल्या त्रिमूर्ती प्लाझासमोर ८ जुलैच्या रात्री उभी होती. शुक्रवारी (दि.९) सकाळी गाडी नसल्याचे एखंडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. पोलीस तपास सुरू असतानाच शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राज्यस्थानमधील चित्तोडगढ येथील पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधत नाकेबंदी व वाहन तपासणी दरम्यान फॉर्च्यूनर गाडी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.

चोरट्यांनी या गाडीवरील स्टिकर, रेडिअम व इतर गोष्टी काढून टाकल्या होत्या. तर गाडीचा नंबर बदलून (जीजे ०१ डब्ल्यूबी ०१३७) या नंबरची प्लेट लावण्यात आली होती. नाकेबंदीत वाहन तपासणी दरम्यान राज्यस्थान पोलिसांनी तपासणी केली असता त्यांना शंका आली. त्यावर गाडीत तपासणी केली असता गाडीत मिळून आलेल्या चेकबूकच्या आधारे नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधण्यात आल आणि हा गुन्हा उघडकीस आल्याचे समझते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी राज्य महामार्ग पोलीस व मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील महामार्ग पोलिसांना या गाडीची माहिती दिली होती. नाशिकरोड पोलिसांकडून तपास सुरु असताना या माहितीच्या आधारे चित्तोडगड येथील नाकाबंदीत ही गाडी ताब्यात घेतल्याचे समझते. दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, हवालदार अनिल शिंदे आदींचे पथक चित्तोडगड येथे पोहोचले असून संबंधित वाहन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते नाशिककडे रवाना होणार असल्याचे समझते.