अरूण सावरटकर
Fraud : मुंबई : आकर्षक गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून 45 दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक करून पळून गेलेल्या सुनील गुप्ता नावाच्या भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आतापर्यंत सहा ते सातजण तक्रार करण्यासाठी आले असले तरी आणखीन काही लोकांची सुनीलने फसवणूक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे. (fraud of fifty-nine lakhs with the lure of double the amount, incident in dadar)
या प्रकरणातील तक्रारदार बेस्टमधून प्रशासकीय अधिकारी म्हणून डिसेंबर 2024 मध्ये निवृत्त झाले आहेत. ते सध्या माहीम येथे त्यांच्या दोन मुलींसोबत राहतात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत त्यांना सुनील गुप्ता याच्या आकर्षक गुंतवणूक योजनेची माहिती समजली होती. त्यामुळे ते त्यांच्या मित्रांसोबत त्याच्या प्रभादेवी येथील पॉकेट फ्रेंडली इन्वेस्टमेंट ऍण्ड फायनान्स कंन्सलटन्सी कार्यालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना अनेक लोक दुप्पट रक्कम करण्यासाठी आले होते. त्याची भेट घेतल्यानंतर सुनीलने त्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास अवघ्या 45 दिवसांत त्यांची गुंतवणुक रक्कम दुप्पट करुन देतो असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींच्या नावाने 1 लाख 80 हजारांची गुंतवणूक केली होती.
त्यांच्यासोबत त्यांच्या इतर परिचित लोकांनीही तेथे गुंतवणूक केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने कोणालाही दुप्पट रक्कम दिली नाही. तो कार्यालय आणि मोबाइल बंद करुन पळून गेल्याचे नंतर अनेकांच्या निदर्शनास आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात त्यांच्यासह त्यांच्या परिचित लोकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला सांगून सुनील गुप्ताविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्यविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुनील हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
हेही वाचा – Anjali Damania : या राजकारणाची किळस येतेय, धस – मुंडे भेटीवरून दमानिया भडकल्या
Edited by : Ashwini A. Bhatavdekar