Gangster Abu Salemचा भाचा मोहम्मद आरिफला मुंबईतून अटक, UPला घेऊन जाणार

मुंबई : गँगस्टर अबू सालेमचा भाचा मोहम्मद आरिफला फसवणुकीप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला वांद्रे येथून अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या आजमगड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. (Gangster Abu Salem’s nephew Mohammad Arif arrested from Mumbai, will be taken to UP)

आरोपी मोहम्मद आरिफ याने पीडित शबाना परवीनची बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन बळकावली आहे. या प्रकरणी शबाना परवीनच्या तक्रारीवरून आरिफविरुद्ध भादंवि कलम ३८६, ४१९, ४२०, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबाना परवीनच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हेना, सलमान आणि आरिफला आरोपी बनवले. बनावट कागदपत्रे बनवून जमीन बळकावल्याचा आणि खंडणीची मागणी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

या गुन्ह्यामध्ये उत्तर प्रदेश पोलीस त्याचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते. तो मुंबईत लपून बसल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंबई पोलिसांना आरिफबाबत माहिती देत मदत मागितली आणि उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबई पोलिसांनी आरिफबाबत अधिक माहिती  दिली. त्यानुसार आरिफ वांद्रे येथील एका हॉटेलजवळील पान दुकानावर उभा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.

आरिफची माहिती मिळताच उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबई पोलिसांसोबत साध्या वेशात त्याठिकाणी गेले. या कारवाईचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आरिफ एका दुकानासमोर उभा आहे. तो त्याच्यासोबत असलेल्या काही लोकांसोबत चहाचा पित असताना पोलिसांनी त्याला पकडले.

2017 मध्येही झाली होती अटक 
अबू सालेमची 20 नोव्हेंबर 2017 रोजी लखनऊ सीबीआय कोर्टात हजेरी सुरू असताना पोलिसांनी आरिफ आणि अबू सालेमचा भाचा सलिक यांना अटक केली होती. हे दोघेही अबू सालेमला न्यायालयात जबरदस्तीने भेटण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, धमकावणे यासह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांचीही तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.