नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने सुट्टी न मिळाल्याने त्याच्या सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. अमित कुमार सरकार असे आरोपीचे नाव आहे. सुट्टी घेण्यावरून अमित कुमार याचे त्याच्या सहकाऱ्यांशी भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात अमित कुमारने त्याच्या सहकाऱ्यांवर चाकूने हल्ला केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर वाहतूक पोलिसांनी अमित कुमारला ताब्यात घेत त्याला पोलीस ठाण्यात नेले. अमित कुमारचा रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन शहरात फिरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (government employee Amit Kumar Sarkar attacked a colleague with a knife after not getting leave)
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील सोदेपूरमधील घोला येथील रहिवासी असलेला अमित कुमार सरकार हा तंत्रशिक्षण विभागात काम करतो. गुरुवारी (6 फेब्रुवारी) सकाळी सुट्टी घेण्यावरून अमित कुमारचे त्याच्या सहकाऱ्यांशी भांडण झाले. यानंतर अमित कुमारने चाकूने त्याच्या चार सहकाऱ्यावर वार केले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. अमित कुमारने केलेल्या हल्ल्यात जयदेव चक्रवर्ती, संतनु साहा, सार्थ लाटे आणि शेख सताबुल हे चौघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अमित कुमारला सुट्टी न देण्याचे अद्याप समोर आलेले नाही. परंतु त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अमित कुमार हा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त असल्याचाही पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा- NCB Drugs Seized : एनसीबीची मोठी कारवाई; मुंबईत 200 कोटींचे ड्रग्ज जप्त, चौघांना अटक
अमित कुमारला कशी झाली अटक?
अमित कुमार हा दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोलकात्यातील न्यू टाउनमधील कारीगारी भवनासमोर हातात चाकू घेऊन फिरताना दिसला. त्याच्या उजव्या हातात चाकू होता, डाव्या हातात एक बॅग होती. तसेच त्याच्या पाठीवरही बॅग होती. अमित कुमार हा हातात चाकू घेऊन फिरत असल्याने तिथे उपस्थित काही लोकांनी त्याचा व्हिडीओ देखील बनवला. या व्हिडीओमध्ये दिसते की, अमित कुमार हा लोकांना जवळ येऊ नका, असे सांगून घाबरवत आहे. याचदरम्यन, ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमित कुमारला थांबवण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिसांनी अमित कुमारला चाकू फेकून देण्याची वारंवार विनंती केली. यानंतर अमित कुमारने हातातील चाकू खाली टाकताच विधाननगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले.
हेही वाचा – Accident News : अपघातात दहा वर्षांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू, बाईकस्वारासह मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल