Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमHitesh Mehta : आरोपी हितेश मेहताची लाय डिक्टेटर टेस्ट होणार, न्यायालयात अर्ज दाखल

Hitesh Mehta : आरोपी हितेश मेहताची लाय डिक्टेटर टेस्ट होणार, न्यायालयात अर्ज दाखल

Subscribe

न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला बँकेचा महाव्यवस्थापक आणि मुख्य आरोपी हितेश मेहता याची लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे लाय डिक्टेटर टेस्ट होणार आहे.

News By अरुण सावरटकर

मुंबई : न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला बँकेचा महाव्यवस्थापक आणि मुख्य आरोपी हितेश मेहता याची लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे लाय डिक्टेटर टेस्ट होणार आहे. या टेस्टसाठी शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेकडून किल्ला न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळताच हितेश मेहताची ही टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमुळे अनेक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश येणार आहे. गेल्या दोन दशकांत आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांतील आरोपीची लाय डिटेटर टेस्ट होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जाते. (Hitesh Mehta accused in the Rs 122 crore fraud case in New India Cooperative Bank will undergo a lie detector test)

न्यू इंडिया सहकारी बँकेत झालेल्या 122 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. गुन्हा दाखल होताच बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौन या दोघांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीत ते दोघेही पोलिसांना सहकार्य करत नव्हते. सुरुवातीला हितेशने धर्मेशला 70 कोटी, तर या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपी उन्ननाथन अरुणाचलम ऊर्फ अरुणभाई याला 40 कोटी रुपये दिल्याची कबुली दिली होती. तो त्याचा कबुलीजबाब सतत बदलत आहे. दुसरीकडे या गुन्ह्यांतील दुसरा आरोपी धर्मेश याने हितेशकडून त्याला 70 कोटी रुपये मिळाले नसल्याचा दावा केला होता.

हेही वाचा – IPS Transfers : पोलीस दलात बदल्यांचे वारे; 11 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या, 5 अधिकाऱ्यांना बढती

हितेशकडून त्याला दोन कोटी मिळाले होते, मात्र ही रक्कम त्याने पुन्हा हितेशला परत केली होती. हितेश हा पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही धर्मेश पौनने केला आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांनी हितेशची लाय डिटेटर टेस्टची तयारी सुरू केली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी पोलिसाकडून या टेस्टसाठी किल्ला न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत उन्ननाथन अरुणाचलम याच्यासह बँकेचा माजी अध्यक्ष हिरेन भानू व त्याची पत्नी आणि बँकेच्या उपाध्यक्ष अशा तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. उन्ननाथनच्या अटकेसाठी पोलिसांनी बक्षिसही जाहीर केले आहे.

हेही वाचा – Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा, समर्थनाचा प्रश्नच नाही; दानवे काय म्हणाले?


Edited By Rohit Patil