मुंबई : पत्नीसह मुलाची हत्या करून त्या दोघांनी आत्महत्या केल्याच्या बनावाचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या दोघांच्या हत्येप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. शिवशंकर दत्ता असे आरोपी पतीचे नाव असून दुहेरी हत्येच्या याच गुन्ह्यात तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने पत्नी व नंतर आपल्या आठ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. (Husband arrested for allegedly killing wife and child and faking suicide)
कांदिवलीतील नरसीपाडा, सरस्वती चाळीत शिवशंकर हा त्याची पत्नी पुष्पा आणि आठ वर्षांच्या मुलासोबत राहत होता. शिवशंकर हा टेम्पो चालक म्हणून काम करतो. सोमवारी दुपारी बारा वाजता तो घरी आला असता त्याला त्याच्या पत्नीसह मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी ही माहिती समतानगर पोलिसांना दिली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दोघांनाही शताब्दी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा – Saif Ali Khan Attack : फिंगरप्रिंटचा अहवाल नाही, पण शरीफुलविरुद्ध भक्कम पुरावे – मुंबई पोलीस
डॉक्टरांनी तिथे त्या दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. याच प्रकरणात मृत महिला पुष्पाचा पती शिवशंकर दत्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो सतत विसंगत माहिती देत होता. त्यामुळे तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच त्याच्या पत्नीसह मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीची हत्या
दरम्यान, दत्ता कुटुंबीय मूळचे कोलकाताचे रहिवाशी होते. शिवशंकरचे पुष्पासोबत सतत खटके उडत होते. तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन त्याला तिचे अनैतिक संबंध असल्याचे वाटत होते. त्यातून रागाच्या भरात त्याने पुष्पाची गळा आवळून हत्या केली. या हत्येच्या वेळेस त्याचा आठ वर्षांचा मुलगा उठला. त्याने घडलेला प्रकार प्रत्यक्षात पाहिला होता. त्याच्या जबानीमुळे आपल्याला अटक होईल या भीतीने त्याने मुलाचीही गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने दोघांना गळफास लावला होता. त्यांनी आत्महत्येचा बनाव करून तो घरातून पळून गेला होता. मात्र चौकशीदरम्यान हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध दुहेरी हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला आज दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा – Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींच्या हत्येचे कारण आले समोर, शूटरने सांगितले का घेतला जीव