वसई : आमिषाला बळी पडू नको, यासाठी राज्य सरकारकडून जनजागृती केली जात आहे. मात्र तरीही नागरीक भूलथापांना बळी पडताना दिसत आहेत. विरार क्राइम ब्रांच 03 च्या पथकाने नुकताच एका तोतया आयकर आयुक्ताचा भांडाफोड केला आहे. आरोपीने आयकर विभागात सहाय्यक आयुक्त आणि आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 40 हून अधिक उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. या आरोपीकडे आयकर विभागाशी संबंधित विविध 28 बोगस आयकार्डही जप्त करण्यात आले आहेत. (Impersonator Income Tax Commissioner busted in Vasai)
तक्रारदार सफरोद्दीन नयमोद्दीन खान यांनी तोतया आयकर आयुक्ताविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटले की, माझ्या 25 वर्षाच्या मुलीला आयकर विभागात नोकरी लावतो, असे सांगून आरोपीने वेळोवेळी आमच्याकडून 15 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याने आयकर विभागातील बोगस नियुक्ती पत्र आणि आयकार्डही दिले. मात्र संबंधित कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर तोतया आयकर आयुक्ताने दिलेले नियुक्ती पत्र आणि आयकार्ड बोगस असल्याचे निदर्शनास आले. तोतया आयकर आयुक्ताने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्याविरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा – Torres Scam : आरोपींकडून बनावट ओळखपत्रांचा वापर; टोरेस घोटाळ्यातील रियाजची माहिती
मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने, विरार गुन्हे शाखा कक्ष 03 ने 7 जानेवारी रोजी आरोपीला नवी मुंबई तळोजा येथून अटक केली. रिंकू जितू शर्मा (33) असे तोतया आयकर आयुक्ताचे नाव असून तो व्यवसायाने चालक आहे. रिंकू शर्मा हा मूळचा जोधपूर येथील रहिवासी असून तो सध्या नवी मुंबईच्या तळोजा फेज 2 मध्ये राहतो. रिंकू शर्माला वसई न्यायालयात हजर केले असता त्याला 13 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चालक ते तोतया आयकर आयुक्त
दरम्यान, आरोपी रिंकू शर्मा हा गेल्या 15 वर्षांपासून तळोजा फेज 2 मधील, सिद्धिविनायक होम सोसायटी सर्व्हे नंबर 30 याठिकाणी राहतो. आयटी विभागात अधिकाऱ्यांना ने-आण करण्यासाठी ठेका पद्धतीने चारचाकी गाड्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या ठिकाणी आरोपी रिंकू शर्मा हा ठेकेदारामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर ये-जा करताना आरोपीने अधिकाऱ्यांसोबत ओळख वाढवली आणि आयटी विभागाची माहिती करून घेतली. यानंतर त्याने स्वत:चे बोगस आयकर आयुक्ताचे आयडी कार्ड बनवून घेतले. यानंतर त्याने आयकर विभागाचे बोगस शिक्के आणि लेटर्स बनवले. इतकंच नाहीतर गाडीवर अंबर लावून तो स्वत: आयकर आयुक्त असल्याप्रमाणे फिरत होता. त्यामुळे लोकांना त्याच्यावर विशवास बसला आणि याचा फायदा घेत त्याने बेरोजगार तरुणांची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केली.
हेही वाचा – GPS Chip : चिप लावलेल्या खास बॅगेमुळे पकडले गेले चोर; 42 लाखांचे दागिने केले होते लंपास