(Kolhapur Crime) कोल्हापूर : छत्रपती संभाजीनगर येथे परजातीतील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे चुलत भावाने बहिणीचा काटा काढल्याची घटना ताजी असतानाच, कोल्हापुरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वऱ्हाड्यांसाठी बनवलेल्या अन्नात विष मिसळले. मात्र, त्याने स्वत: ते अन्न स्वतः सेवन केले नाही. भाचीच्या लग्नावर नाराज होऊन त्याने असे केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Displeased with niece’s wedding, uncle mixed poison in the guests’ food)
पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील एका लग्नमंडपात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. आरोपी महेश पाटील हा भाचीच्या रिसेप्शनसाठी गेला होता. तिथे पाहुण्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात विष मिसळले. विशेष म्हणजे, आचाऱ्यासमोरच हा प्रकार घडला. त्याला आचाऱ्याने विरोध केल्यानंतर कोणीही ते अन्न खाल्ले नाही. म्हणून पुढील अनर्थ सुदैवाने टळला. काही लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला, असे पन्हाळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी यांनी सांगितले.
हेही वाचा – Beed Police : वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी आरोपी विष्णू चाटेचे घेतले व्हॉईस सॅम्पल
महेश पाटील याचा या लग्नाला विरोध होता. तरुणीने नुकतेच पळून जाऊन गावातील एका तरुणाशी लग्न केले होते. त्याचसाठी रिसेप्शन ठेवले होते, पण महेश पाटीलला हे मान्य नव्हते. रागाच्या भरात त्याने लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पाहुण्यांसाठी बनवल्या जाणाऱ्या जेवणात विष मिसळले, असेही कोंडुभैरी म्हणाले.
पोलिसांनी आरोपी महेश पाटीलविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 286 आणि 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अन्नाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंग
छत्रपती संभाजीनगर येथे परजातीतील मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्यामुळे चुलत भावाने बहिणीलाच संपविल्याची थरारक घटना घडली आहे. त्याने बहिणीला डोंगरावरून खाली ढकलून देत खून केला. ऑनर किलिंगची ही घटना तिसगाववळ खवड्या डोंगर परिसरात सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. नम्रता गणेशराव शेरकर (17, रा. शहागड, ता. अंबड, जि. जालना) असे मृताचे नाव आहे. ऋषिकेश तानाजीराव शेरकर (25, रा. वळदगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असं आरोपी भावाचे नाव आहे.
हेही वाचा – Torres Scam : टोरेस कंपनीचे मालक विदेशात फरार; गुंतवणूकदाराने सांगितलं घोटाळ्यात कसे अडकलो