कोल्हापूरात भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक चाकूहल्ला

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

kolhapur ichalkaranji knife attack on bjp corporators husband vinayak hukkire

कोल्हापूर मधील इचलकरंजी इथे भाजप नगरसेविकेच्या पतीवर रात्री जुन्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विनायक हुक्किरे हे गंभीर जखमी असून, त्यांना सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे हे शनिवारी रात्री उशिरा जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. इचलकरंजी-कोल्हापूर रोडवरील हॉटेल रविराज येथे ते जेवत असताना त्यांच्यावर तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्लेखोरांकडे चाकू, कोयता अशी शस्त्रे होती. एकाच वेळी तिघा-चौघांनी त्यांच्यावर वार केल्याने काही वार त्यांच्या वर्मी लागले. त्यामुळे ते जागीच कोसळले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तेथून सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी बसवराज महादेव तेली उर्फ कानापत्रावर, अशोक तमन्ना तेली, सुभाष तमन्ना तेली या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

विनायक हुक्कीरे हे भाजपच्या नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती आहेत. विनायक यांचा जिमचा व्यवसाय आहे. दरम्यान, बसवराज आणि सद्दाम या दोघांचा आर्थिक वाद होता तो वाद मिटवून बसवराजने सद्दामला द्यावे लागत असणारे पैसे द्यावेत यासाठी विनायकने तगादा लावल्याने बसवराजने चिडून विनायक हुक्कीरे याच्या घरावर आठवड्या भरा पूर्वी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सद्दामचे पैसे बसवराजने द्यावे यासाठी विनायक यांनी प्रयत्न सुरूच ठेवले होते. मुळे बसवराजने मित्रांसोबत जेवायला गेलेल्या विनायक हुक्कीरे यावर रविराज हॉटेल मध्ये जाऊन माझा वाद मिटवणारा तू कोण असे हटकत विनायक यांच्यावर चाकू, कोयत्या सारख्या धारदार शास्त्राने हल्ला केला. विनायक वार वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. हॉटेलच्या हॉल मधून किचनमध्ये गेले तिथे ते सापडल्याने त्यांच्यावर बसवराजने पोटावर, छातीवर, मांडीवर आणि पाठीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले.