ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेवर हल्ला करण्यात आला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या एका पुलावर महिला आणि पुरुषामध्ये वाद झाला. या वादात पुरुषाने महिलेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आणि तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली असून पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. अशामध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्यांमध्ये अनेक अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये महिलांवर दिवसाढवळ्या जीवघेणे हल्ले झाल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Crime issues as incidents of women gets attacked in day light)
हेही वाचा : Kalyan Crime : जामीन झाला नाहीतर एके 47 घेऊन येतो, पीडित कुटुंबियांच्या घरासमोर तरुणाची धमकी
वसईत दिवसाढवळ्या झालेली हत्या
काही महिन्यांपूर्वीच वसईमध्ये मनाला सुन्न करणारी एक घटना घडल्याचे समोर आले होते. 18 जून 2024 रोजी सकाळी भररस्त्यात एका तरुणीची तिच्या प्रियकराने सपासप वार करून हत्या केली होती. तेथील सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या व्हिडीओमधून हे समोर आले की, संबधित तरुणी ही कामावर जात असताना आरोपीने तिच्या मागून येऊन तिच्या डोक्यावर लोखंडी पान्याने वार केले. त्या आरोपीने तिच्यावर एकापाठोपाठ अनेक वार केल्यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे यावेळी तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. समोर आलेल्या व्हिडीओमधून यावेळी कोणीही त्या तरुणीच्या बचावासाठी पुढे आले नव्हते. वरदळीची जागी घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला.
विरारमध्ये भररस्त्यात पतीचा पत्नीवर हल्ला
विरार रेल्वे स्थानकाजवळ एका पतीने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. पण रस्त्याने जाणाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने महिलेचा जीव वाचला. लोकांनी आरोपीला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही ऑफिसला जात असताना विरार रेल्वे स्टेशनजवळील पुलावर पोहोचली. यावेळी तिच्या पतीने मागून तिचा गळा दाबला आणि चाकूने तिच्या मानेवर वार केले. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी तिचा ओरडण्याचा आवाज ऐकला आणि मोठी गर्दी जमा झाली. यावेळी पतीने घाबरून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण जमावाने पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. जमावामुळे त्या महिलेचा जीव वाचला.
सांगलीत पतीचा पत्नीवर हल्ला
ऑगस्ट महिन्यात सांगलीमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीवर हल्ला करण्यात आला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूवी प्रेमविवाह झालेले जोडपे हे काही वाद झाल्यामुळे वेगवेगळे राहत होते. 7 ऑगस्ट 2024 रोजी पत्नी महाविद्यालयात जात असताना पतीने तिच्यावर शहरातील कॉलेज कॉर्नरजवळ कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिला गंभीर दुखापत झाली.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोमधून समोर आली ही माहिती
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोकडून (NCRB) समोर आलेल्या 2021-22 च्या आकडेवारीनुसार, 2021 या वर्षात राज्यात दररोज 109 महिलांवर हिंसाचाराच्या घटनांची नोंद झाल्याचे समोर आले. तर, 2022मध्ये ही संख्या 126 पर्यंत वाढली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षात यामध्ये आणखी वाढ झाले असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा हा महत्त्वाचा ठरत आहे.