घरक्राइमएकाच गाडीला १२ वेळा OLX वर विकलं; जीपीएस लावून गाडी पुन्हा शोधायचा

एकाच गाडीला १२ वेळा OLX वर विकलं; जीपीएस लावून गाडी पुन्हा शोधायचा

Subscribe

चोर चोरी करण्यासाठी काय शक्कल लढवतील याचा काहीही नेम नाही. उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील एका चोराने एक गाडी तब्बल १२ वेळा OLX विकण्याचा प्रताप केला आहे. अखेर पोलिसांनी या चोराला बेड्या ठोकल्या आहेत. मनोत्तम त्यागी उर्फ मनू त्यागी असे या चोराचे नाव आहे. हा चोर OLX वर गाडी विकण्यासाठी जाहीरात टाकायचा. गाडी विकल्यानंतर त्या गाडीला जीपीएस लावून ठेवायचा. त्यानंतर गाडीचा थांगपत्ता लावून स्वतःकडी डुप्लीकेट चावीने गाडी पुन्हा लंपास करायचा.

चोराने अशाप्रकारे एकच गाडी डुप्लिकेट चावी आणि जीपीएसच्या बळावर १२ वेळा चोरली आणि पुन्हा पुन्हा OLX वर विकली. बरं हा चोर देखील काही कच्चा खेळाडू नव्हता. ऑगस्ट महिन्यातच तो उत्तराखंडच्या तुरुंगातून बाहेर आला होता. तिथेही त्याने चोरीचपाटी करुन तुरुंगाची हवा खाल्ली. त्यागीच्या विरोधात उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच हत्या आणि जबरी चोरीचेही दोन गुन्हे त्याच्यावर आहेत.

- Advertisement -

अशी पकडली गेली चोरी

आरोपी मनू त्यागीने जीते यादव नावाच्या इसमाला ही गाडी विकली होती. आरोपीने चोरी झाल्यानंतर पोलिसांत तक्रार देताना सांगितले की, दोन महिन्यापुर्वी त्याने त्यागीकडून २.७० लाखांत एक गाडी विकत घेतली. मात्र आरोपीने कागदपत्र हस्तांतरीत केले नाहीत. दरम्यान OLX वर त्याच गाडीची पुन्हा जाहीरात लागल्याचे यादवच्या लक्षात आले. आपली फसवणूक होत असल्याच्या संशयातून यादवने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

नोएडाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त रणविजय सिंह यांनी सांगितले की, चोर मुळचा अमरोहा जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच्याकडून एक बनावट नंबर प्लेट लावलेली वॅगन आर गाडी, दोन मोबाईल, बोगस पॅन आणि आधार कार्ड तसेच १० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -