अनैतिक संबंधाचा संशय; दोन्ही हात, पाय व मुंडके धडापासून केले वेगळे

चार मित्रांनी धारदार शस्त्रांनी केला एका मित्राचा खून.

पुण्यातील इंदापूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून चार मित्रांनीच एका मित्राचा धारदार शस्त्रांनी खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत मृत व्यक्तीचे दोन्ही हात, पाय व मुंडके धडापासून तोडण्यात आले होते. ही घटना गणेशवाडी येथे घडली. वयवर्ष २३ असणाऱ्या या मृत व्यक्तीचे नाव संजय महादेव गोरवे असे असून तो टाकळी, टेंभुर्णी येथे राहण्यास होता. तर या व्यक्तीचा खून करणाऱ्या आरोपींची नावं दादा कांबळे, लकी विजय भोसले, विकी उर्फ व्यंकटेश विजय भोसले आणि महेश उर्फ शैलेश प्रभाकर सोनवणे अशी असल्याची माहिती मिळतेय. तर या प्रकरणातील विकी भोसलेसह महेश सोनवणे या दोघांना इंदापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मृत तरुणाची आई मंजूषा गोरवे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून चार मित्रांनी धारदार शस्त्रांनी एका मित्राचा खून केला. संजय, लकी, विकी आणि महेश एकमेकांचे मित्र असल्याने त्यांचा घरोबा होता. त्यामुळे त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे सुरू होते. या भेटीगाठीतून लकी, विकी व महेश यांच्या नातेवाइक असलेल्या सुश्मिता, सखुबाई व कोमल यांच्याशी संजयची ओळख झाली. दरम्यान दादा कांबळे यांच्या घरी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानिमित्त संजयला त्यांनी बोलावून घेतल्याची कल्पना मृत व्यक्तीच्या आईला होती. त्या दिवसापासून संजय घरी परत न आल्याने संजय बेपत्ता असल्याची तक्रार संजयच्या घरच्यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने असे सांगितले की, भीमा नदीच्या पात्रात एक मृतदेह तरगंत आहे. हा मृतदेह संजयचाच तर नाही ना…या करता खात्री पटवण्यासाठी संजयच्या घरच्यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करत पोलिसांची मदत घेतली. दरम्यान या घटनेचा तपास सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे.