(MP Crime News) भोपाळ : मध्य प्रदेशच्या रतलाममधील दोन पोलीस सध्या चर्चेत आहेत. त्यांनी आपल्या स्वास्थ्याची घेतलेली काळजी आणि दरोडेखोराबाबत दाखवलेली बेपर्वाई यामुळे पोलीस टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. कैदेत असलेल्या दरोडेखोरासोबत मसाज सेंटरमध्ये हे पोलीस गेले होते. त्यामुळे या दोन्ही पोलिसांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर मसाज सेंटरमधून पळून गेलेल्या दरोडेखोराचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. (Action against two policemen in the case of escape of robber)
उज्जैनच्या नागदा येथील प्रकाश नगर परिसरातील शिवा बाबा लिकर कंपनीच्या कार्यालयात 25 डिसेंबर रोजी दरोडा पडला होता. कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून पाच दरोडेखोरांनी 18 लाख रुपये लुटले होते. या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित शर्मा 5 जानेवारीपासून खाचरोड उप-कारागृहात होता. त्याच्या पायाला दुखापत झाली होती आणि त्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी 11 वाजता तुरुंगरक्षक राजेश श्रीवास्तव आणि गार्ड नितीन दलोदिया यांनी त्याला खाचरोडच्या सरकारी रुग्णालयात नेले. तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परतला नाही. रोहित शर्मा रुग्णालयातून पळून गेला, असे राजेश श्रीवास्तव यांनी संध्याकाळी तुरुंग अधीक्षकांना फोनवरून कळवले.
हेही वाचा – BUDGET 2025 : तुमच्या खिशावर परिणाम करतील पाच बदल; 1 फेब्रुवारीपासून बदलणार हे नियम
अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी दोन्ही तुरुंग कर्मचाऱ्यांची चौकशी केली, परंतु दोघांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे वरिष्ठांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन्ही पोलीस कैद्यासह रुग्णालयातून बाहेर पडत होते. यासंदर्भात अधिक तपास करत असताना असे दिसले की, दोन्ही तुरुंग रक्षक आरोपीला 30 किलोमीटर अंतरावरील रतलामला घेऊन गेले. तिथे स्टेशन रोडवरील एका स्पा सेंटरमध्ये त्यांनी मसाज करून घेतला. तिघेही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मालिश घेण्यात मग्न असतानाच रोहित तिथून पळून गेला.
याची माहिती मिळाल्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी रतलाम गाठले आणि स्पा सेंटरचा डीव्हीआर जप्त केला. तुरुंग अधीक्षक सुरेंद्र सिंह राणावत यांच्या तक्रारीवरून, खाचरोड पोलिसांनी रोहित तसेच दोन्ही पोलिसांविरुद्ध बीएनएसच्या (Bharatiya Nyaya Sanhita) कलम 262, 264 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच, दोघांनाही निलंबित करण्यात आले असल्याचे उज्जैनचे पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले. (MP Crime News : Action against two policemen in the case of escape of robber)
हेही वाचा – Parliament session : वक्फ बोर्ड, एआयपासून महाकुंभतील चेंगराचेंगरीपर्यंत…, राष्ट्रपतींचे संसदेत अभिभाषण