नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून छत्तीसगडमधील बस्तरमधील वास्तव समोर आणणाऱ्या निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 28 वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर हा 1 जानेवारीपासून बेपत्ता होता. पण शुक्रवारी (3 जानेवारी) त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. बीजापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुकेशने आपल्या पत्रकारितेच्या प्रवासात अनेक अडचणींवर मात केली. ईटीव्हीवरून पत्रकारितेची सुरुवात करत, नंतर न्यूज 18 छत्तीसगड आणि शेवटी बस्तर जंक्शन या यूट्यूब चॅनलद्वारे त्यांनी दंडकारण्यातील आदिवासींच्या व्यथा, माओवादी चळवळींचे वास्तव आणि सुरक्षा दलांचा संघर्ष प्रभावीपणे मांडला. (Mukesh Chandrakar Chhattisgarh Journalist found dead)
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील विजापूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला. ‘बस्तर जंक्शन’ नावाचे यूट्यूब चॅनल चालवणारे मुकेश चंद्राकर 1 जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होते. शुक्रवारी त्यांचा मृतदेह ठेकेदाराच्या कंपाऊंडमध्ये बांधलेल्या सेप्टिक टाकीत सापडला. छत्तीसगडमधील पत्रकारांनी मुकेश चंद्राकर यांनी कंत्राटदार सुरेश चंद्राकर विरोधात रस्तेबांधणीतील कथित भ्रष्टाचाराची बातमी दिली होती. त्यामुळे मुकेशचा हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्याचे शेवटचे ठिकाणही ठेकेदाराने बांधलेले कंपाऊंड असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेवर बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी सांगितले की, “संबधित घटनेमध्ये पोलिसांना काही माहिती मिळाली आणि त्यानंतर एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, पोलिसांची एक पथकदेखील यासंदर्भात दिल्लीला पाठवण्यात आले आहे.” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, या प्रकरणात असे सांगितले जात आहे की, पोलिसांच्या तपासानंतर ठेकेदार सुरेश चंद्राकर याच्या भावाला पोलिसांनी दिल्लीतून ताब्यात घेतले आहे.
मुकेश चंद्राकार यांनी गेली 10 वर्ष छत्तिसगढमधील बस्तरचे वास्तव जगासमोर मांडण्याचे काम केले. त्यांच्या बस्तर जंक्शन या युट्युबच्या चॅनलद्वारे माओवाद्यांच्या कॅम्पचे थेट प्रक्षेपण करत खळबळ उडवली होती. त्यांनी माओवादी चळवळींचा अभ्यास करून सुरक्षा दलांवर होणाऱ्या हल्ल्यांमागील योजना उघड केल्या होत्या. तसेच, 2021 मध्ये विजापूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर माओवाद्यांनी पकडलेल्या सीआरपीएफ जवानांच्या सुटकेमध्ये मुकेश चंद्राकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीआरपीएफ कमांडो राकेश्वर सिंग मन्हास याच्या सुटकेसाठी राज्य पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्यांना श्रेय दिले होते. मुकेशने नक्षलवादी हल्ले, चकमकी आणि बस्तर प्रभावित करणाऱ्या इतर मुद्द्यांवर विस्तृतपणे वार्तांकन केले आहे.