मुंबई : संसार मोडल्याच्या रागात जावयानं सासूला ठार करत, तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतील मुलुंड परिसरात ही घटना घडली. बाबी दाजी उसरे (72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (59) हा बाबी उसरे यांचा जावई होता. कृष्णा अटनकर आणि बाबी उसरे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. सासू बाबी उसरे हिला जाळल्यानंतर कृष्णा अटनकर याने स्वत:ला आत्महत्या केली. टेम्पोतून जात असताना अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून घेत स्वत:ला पेटवून दिलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Mulund Murder Divorce man burns mother in law Husband wife clashes In Mumbai)
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा अटनकर आणि बाबी उसरे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. कृष्णा अटनकर आणि त्यांच्या पत्नीची अनेकदा भांडणे व्हायची. याच कौटुंबिक कलहाला कंटाळून कृष्णा अटनकर यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. या दोघांचा दहा वर्षांपूर्वी घटस्फोटझाला होता. यासाठी आपली सासू बाबी उसरे कारणीभूत असल्याचा राग कृष्णा यांच्या मनात होता. या प्रकरणी मुलुंडच्या नवघर पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली होती. बाबी उसरे आणि कृष्णा अटनकर या दोघांनी आत्महत्या केली असावी, असे पोलिसांना वाटले होते. मात्र, चौकशीनंतर हा हत्येचा प्रकार असल्याचे समोर आले.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा हा ड्रायव्हर होता. कृष्णा आणि त्याच्या पत्नीचा 10 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. संसार मोडल्यानंतर कृष्णाची माजी पत्नी मुलुंड येथील आपल्या आईच्या घरी राहायला गेली होती. ती आपल्या 20 वर्षांच्या मुलासोबत तिकडे राहत होती. कृष्णा अनेकदा त्यांना भेटायला जात होता. याच भेटण्यावरून कृष्णा आणि बाबी उसरे यांच्यात वाद झाला होता. या वादाला कंटाळून कृष्णाने त्याची सासू बाबी उसरे हिची हत्या केली.
आरोपी कृष्णानं हत्या कशी केली?
सोमवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजताच्या सुमारास कृष्णा त्याची सासू बाबी उसरे यांच्या घरी गेला. त्यानंतर बाबी उसरे यांना रुग्णालयात तपासणीसाठी जायचे असल्याने कृष्णा त्यांना आपल्या मिनी टेम्पोतून घेऊन निघाला. घरातून निघाल्यानंतर कृष्णाने घरापासून काही अंतरावर टेम्पो पार्क केला. कृष्णाने बाबी उसरे यांना टेम्पोच्या मागच्या भागात बसवले होते. बाबी उसरे टेम्पोच्या मागच्या भागात बसल्यानंतर कृष्णाने टेम्पोचा दरवाजा आतून लावून घेतला. त्यानंतर कृष्णाने अचानक हातोडी काढून बाबी उसरे यांच्या डोक्यावर तीन-चार वेळा मारले. त्यामुळे बाबी उसरे बेशुद्ध पडल्या. ही संधी साधून कृष्णा अटनकर याने बाबी यांच्या अंगावर पेट्रोल आणि थिनर ओतून त्यांना पेटवून दिले. त्यानंतर कृष्णाने स्वत:च्या अंगावरही पेट्रोल आणि थिनर ओतून घेत आत्महत्या केली.
दरम्यान, टेम्पोने अचानक पेट घेतल्याचं दिसताच या परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवून टेम्पोचे दार उघडले तेव्हा आतमध्ये हातोडी, रॉकेलची बाटली, लायटर आणि बाबी व कृष्णा यांचे मृतदेह आढळला.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास करताना बाबी उसरे यांच्या घरापासून ज्या ठिकाणी टेम्पो पार्क केला होता तिथपर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी नाणेपाडा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कृष्णा टेम्पोच्या दिशेने जात असल्याचे दिसले.