मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे चित्र सध्या दिसत आहे. नुकतेच मुंबईतील दादरमध्ये क्षुल्लक वादातून एका 40 वर्षाच्या व्यक्तीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मनोज सहारे या आरोपीला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान ही हत्या क्षुल्लक कारणावरुन झाल्याचे समोर आले असून आरोपीला रविवारी (29 डिसेंबर) स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Mumbai Crime in Dadar one man killed)
हेही वाचा : Crime News : चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या; बदलापूर, कल्याणनंतर मुरुड
मिळालेला माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव चंदन असून तो फुटपाथवर राहतो. शुक्रवारी (27 डिसेंबर) सकाळी 11.30 वाजता दादर येथील शिवाजीपार्क, रुक्मिणी सदन इमारतीसमोरील फुटपाथवर एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमी व्यक्तीला सायन रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीदरम्यान मृत व्यक्तीचे नाव चंदन असून तो फुटपाथवर राहत असल्याचे उघडकीस आले. त्याच्यासोबत रात्री उशिरा मनोज सहारे होता. पण या घटनेनंतर तो पळून गेला होता.
तपासामध्ये आलेल्या माहितीनंतर पोलिसांनी मनोजचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मनोज सहारेला दादर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत 26 डिसेंबरला रात्री उशिरा त्याचे चंदनसोबत क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून त्याने त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे काबुल केले. या हत्येनंतर तो पळून गेला होता. त्याच्या चौकशीनंतर त्याला पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्यांत अटक केली. मनोज हा शिवाजी पार्क मैदानाजवळील फुटपाथवर राहत होता. तो भंगार वेचण्याचे काम करतो. अटकेनंतर त्याला रविवारी (29 डिसेंबर) दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.