मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे घटना समोर आल्या आहेत. अशामध्ये मुंबईतील वरळीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला. कामावरून काढून टाकल्याच्या रागातून बांधकाम साईटच्या सुपरवायझरची तीन जणांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मोहम्मद खान असे हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी तिनही मारेकर्यांना काही तासांमध्ये वरळी पोलिसांनी अटक केली. सुधांशू कांबळे, भावेश शिंदे तसेच साहिल मराठी अशी या तिघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना गुरुवारी 6 मार्चला वरळीमधील ई मोजेस रोड, जिजामाता स्माशनभूमीमागील कांबळेनगर एसआरए रिडेव्हलमेंट साईटवर घडली. (Mumbai Crime Mumbai Worli 3 arrested for SRA project supervisor murder)
हेही वाचा : Rajiv Gandhi : …तरीही त्यांना पंतप्रधान बनवले, मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत
मोहम्मद खान हा वरळी येथे राहत असून मोहम्मद शब्बीर हा त्याचा भाऊ आहे. तो वरळीतील कांबळेनगर एसआरए बांधकाम साईटवर सुपरवायझर म्हणून कामाला आहे. या साईटवर सुधांशू व त्याचे काका कामाला होते. त्यापैकी त्याच्या काकांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर सुधांशूच्या पेमेंटवरुन त्याचा मोहम्मदसोबत वाद सुरु होता. याच वादातून बुधवारी रात्री साडेबारा वाजता सुधांशूसह इतर दोघांनी बांधकाम साईटवर जाऊन मोहम्मदवर चाकूने वार केले होते. त्यात गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला जवळच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच उपचारादरम्यान मोहम्मद शब्बीरचा मृत्यू झाला होता.
वरळीमध्ये झालेल्या या हत्याची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मोहम्मद इर्शाद याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुधांशू, भावेश आणि साहिल या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना गुरुवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.