Mumbai Crime : शायनिंग मारण्यासाठी पिस्तूल आणणार्‍या तिघांना अटक

घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई आणि कोठडी

missing mother and son death body found in Drain at laldongari chembur
missing mother and son death body found in Drain at laldongari chembur

मुंबई : शायनिंग मारण्यासाठी पिस्तूल आणणार्‍या तीन तरुणांना सोमवारी दिडोंशी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरजीत अवतार सिंग, निकुंजकुमार पटेल आणि प्रकाश धनश्याम सैतानी अशी या तिघांची नावे आहेत. यातील गुरजीत आणि निकुंजकुमार हे फिल्मसिटीमध्ये शूटींगमध्ये कामगार तर प्रकाश हा इव्हेंट मॅनेजमेटचे काम करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. या तिघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोरेगाव येथे राहणार्‍या एका तरुणाने मध्यप्रदेशातून घातक शस्त्रे आणली असून ती घातक शस्त्रे त्याने त्याच्या राहत्या घरी ठेवल्याची माहिती दिडोंशी पोलिसांच्या एटीएस पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धरणेंद्र कांबळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण, एटीएसचे उपनिरीक्षक देवर्षी व अन्य पोलीस पथकाने सोमवारी रात्री गुरजीत सिंग याच्या गोरेगाव येथील संतोषनगरातील राहत्या घरी छापा टाकला होता.

यावेळी गुरजीतसोबत तिथे प्रकाश आणि निकुंजकुमार हे दोघेही होते. या तिघांच्या अंगझडतीत पोलिसांना गुरजीतकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल तर इतर दोघांकडून प्रत्येकी दोन जिवंत काडतुसे सापडले. या पिस्तूलविषयी चौकशी केली असता त्यांनी ते मध्यप्रदेशातून आणले होते. शायनिंगसाठी त्यांनी ते पिस्तूल आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र ही शायनिंग त्यांच्या चांगलीच अंगाशी आली आहे.

पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांनी यापूर्वीही मध्यप्रदेशातून घातक शस्त्रे आणली होती का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


चार महिन्यांच्या मुलीची ४ लाख ८० हजारांना केली विक्री; पोलिसांनी केला पर्दाफाश