मुंबई : राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी हत्येत मुंबई पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या 26 आरोपींना सोमवारी अटक करुन मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. याच गुन्ह्यांत कटाचा मुख्य आरोपी आणि मोस्ट वॉण्टेड गॅगस्टर अनमोल बिश्नोईसह शुभम रामेश्वर लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर या तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहेत. (mumbai police big action in baba siddiqui murder case mcoca imposed on 26 accused)
दसऱ्याच्या दिवशी, 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दिकी यांची वांद्रे येथे अनमोल बिष्णोई याच्या आदेशावरुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर पळून जाणार्या तीनपैकी गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, एक मॅगझिन, 28 जिवंत काडतुसे जप्त केले होते. या गुन्ह्यांचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाला सोपविण्यात आले होते. या दोघांच्या अटकेनंतर त्यांच्या चौकशीतून आलेल्या माहितीवरून पोलिसांनी इतर 24 आरोपींना विविध परिसरातून अटक केली.
प्रवीण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकराम निशाद, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया, भगवतसिंग ओमसिंग, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ, करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड, सुजीत सुशील सिंग, गौरव विलास आपुणे, आदित्य राजू गुळणकर, रफिक नियाज शेख, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव, अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह, आकाशदिप कारजसिंग गिल, सलमानभाई इक्बालभाई बोहरा, सुमीत दिनकर वाघ यांनी अटक करण्यात आली आहे. सध्या हे सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.
सिद्दिकी हत्येप्रकरणी सर्व आरोपींना मोक्का
दरम्यान, या आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई पोलिसांनी सुरू केली होती. अखेर शनिवारी अटक केलेल्या 26 आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत या सर्वांना सोमवारी अटक करून मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. अनमोल बिश्नोई याच्या आदेशवरुन बाबा सिद्धीकी यांची हत्या झाली होती. त्यामुळे या कटात त्याला मुख्य आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यानेच शुभम लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर यांच्यासह इतर आरोपींच्या मदतीने हा कट यशस्वी केला होता. त्यामुळे अनमोलसह शुभम आणि झिशान या तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे. अनमोलला अमेरिकेत अटक केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर दोन आरोपी अद्याप फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar