मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा भरधाव वेगाने एका निरागस चिमुकल्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली. भरवेगात जाणार्या एका चारचाकीने फुटपाथवर झोपलेल्या मायलेकाला चिरडल्याची घटना समोर आली. या गाडीच्या धडकेत वरदान निखिल लोंढे या दीड वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्याची त्याची आई प्रिया निखिल लोंढे ही गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी आरएके मार्ग पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी वाहनचालक कमल विजय रायला अटक केली होती. पण त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. पण या अपघाताने पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Mumbai Wadala Hit And Run Case small children died on the spot)
हेही वाचा : Bacchu Kadu : कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आले असते पण…; बच्चू कडू स्पष्टच बोलले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (22 फेब्रुवारी) रात्री 11.30 वाजता वडाळा येथील बलराम केडेकर मार्गावर 29 वर्षीय प्रिया लोंढे आणि तिचे दोन मुले स्वरूप (5 वर्षे) आणि वरदान (दीड वर्ष) यांच्यासोबत राहत होती. वडाळा येथील बाळाराम खेडेकर मार्ग, राम मंदिर जवळील मांग गारोडी समाज झोपडपट्टीत हे राहायला आहेत. शनिवारी रात्री 11.30 वाजता ती आणि तिचा 18 महिन्यांचा मुलगा वरदानसोबत झोपडीलगतच्या फुटपाथवर झोपली होती. यावेळी तेथून जाणार्या एका गाडीने या दोघांनाही धडक दिली. अपघातात ते दोघेही मायलेक गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने जवळच्या केईएम रुग्णालयात दाखल केले. तिथे वरदानला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर प्रियावर उपचार सुरू करण्यात आले.
अपघात घडल्यानंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांनी त्याला पकडून आरएके मार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी प्रियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहनचालक कमल रायविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोपीवर आरएके मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 106, 125(ब) आणि 281 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.