सलग दुसर्‍या दिवशी डोंगरी परिसरात एनसीबीची कारवाई

ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Drugs

डोंगरी परिसरात ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केल्यानंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांनी सलग दुसर्‍या दिवशी कारवाई करुन एका आरोपीस अटक केली आहे. हा आरोपी परवेज खान ऊर्फ चिंकू पठायचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी त्याला लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात एनसीबीला यश आले आहे. दुसरीकडे आरिफ भुजवाला हा अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी एनसीबीने विशेष मोहीम सुरु केली आहे. तर त्याच्या डायरीत या अधिकार्‍यांना २० हून अधिक ड्रग्ज माफियांची नावे समोर आली असून आरिफचे दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस आणि फईम मचमच याच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात एनसीबीला यश आले आहे.

ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यांचा पर्दाफाश

गेल्या दोन दिवसांत एनसीबीने मुंबई आणि नवी मुंबईतून परवेज खान, झाकीर हुसैन फझल शेख यांच्यासह इतर आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर या अधिकार्‍यांनी डोंगरी परिसरात कारवाई करुन ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यांचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत या अधिकार्‍यांनी कोट्यवधी रुपयांचे बारा किलो ड्रग्ज, दोन रिव्हॉल्व्हर, २ कोटी १८ लाख रुपयांची कॅश, एका डायरी आणि इतर मुद्देमाल जप्त केला होता. ही डायरी आरिफची असून त्यात वीस मोठ्या ड्रग्ज माफियांची नावे आहेत. आरिफला ड्रग्जच्या व्यवसायात दिवसाला सुमारे एक कोटी रुपये मिळत होते. त्यातील काही पैसे त्याने रियल इस्टेटमध्ये गुंतविले होते तर काही पैसे त्याने हवालामार्फत दुबईला पाठविले होते. या पैशांसाठी देशविघातक कारवायांसाठी वापर झाला आहे का याचा आता तपास सुरु आहे. ही माहिती एनसीबीकडून संबंधित गुप्तचर यंत्रणेला देण्यात आली आहे. या डायरीत या अधिकार्‍यांना कोड वर्ड सापडले असून त्यात ग्रे, गिटार आणि ब्राऊन आदींचा समावेश आहे.

आरोपीला शनिवारी कोर्टात हजर करणार

ग्रे म्हणजे क्वालिटी, गिटार म्हणजे शास्त्र, व्हाईट आणि ब्राऊन म्हणजे एमडी असा त्याचा अर्थ असल्याचे बोलले जाते. आरिफने ड्रग्ज तस्करीतून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमा केली आहे. त्याचे काही बँकेत खाते असून या खात्याची आता चौकशी सुरु आहे. त्याच्याकडे काही महागड्या गाड्या आहेत. गेल्या काही वर्षांत आरिफने ४० हून अधिक महागड्या गाड्या खरेदी केल्याचे बोलले जाते. या सर्व संपत्तीची सध्या माहिती काढण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी एनसीबीकडून ईडी आणि एनआयएची घेतली जाणार आहे. या डायरीतून आरिफने गेल्या पाच ते सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची विक्री केली आहे. अंदाजे पंधराशे कोटी रुपयांचे ड्रग्ज विकल्याचा एनसीबीला संशय आहे. आरिफ हा पठाण गँगचा सदस्य असून ही टोळी सोन्याच्या तस्करीतून आता ड्रग्ज तस्करीचा धंदा करीत असल्याचे आरोपींच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. त्यांच्या चौकशीतून आणखीन काही माहिती उघडकीस येण्याची शक्यता एनसीबीकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, याच गुन्ह्यांत शुक्रवारी परवेज खानच्या एका नातेवाईकाला अटक केली. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे. तो परवेजसाठी काम करीत होता. त्याच्या सांगण्यावरुन त्याने आतापर्यंत अनेकांना ड्रग्जची विक्री केली आहे, त्याला शनिवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.


हेही वाचा – आर्थिक वादातून ३५ वर्षाच्या तरुणाची हत्या