(Nishant Tripathi suicide) मुंबई : अॅनिमेशन उद्योगातील एका 41 वर्षीय व्यक्तीने मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आत्महत्येचे कारण आणि त्याच्या पत्नीला लिहिलेला शेवटचा संदेश त्याच्या कंपनीच्या वेबसाइटवर अपलोड केला. या अॅनिमेटरचे नाव निशांत त्रिपाठी असून, त्याने 28 फेब्रुवारी रोजी हे टोकाचे पाऊल उचलले. वेबसाइटवर केलेल्या पोस्टमध्ये त्याने आपल्या मृत्यूला कारण पत्नी अपूर्वा आणि तिची मावशी प्रार्थना मिश्रा असल्याचा उल्लेख केला होता. आता निशांतची आई नीलम त्रिपाठी यांनी एक लांबलचक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Mother’s emotional Facebook post goes viral)
पत्नीने मानसिक छळ केल्याचा आरोप करत निशांत त्रिपाठी याने विलेपार्ले येथील सहारा हॉटेलमध्ये आत्महत्या केली. त्यापूर्वी निशांतने हॉटेलमधील खोलीच्या दरवाजावर ‘डू नॉट डिस्टर्ब’चा बोर्ड लावला होता. चेक-आऊटची वेळ टळल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी दार ठोठावले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मास्टर चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो आतून बंद होता. परिणामी, दरवाजा तोडण्यात आला आणि निशांतचा मृतदेह आत आढळला.
#BREAKING: Nishant Tripathi, a 41-year-old man, committed suicide in a Mumbai hotel room, blaming his wife and her aunt for his death. He left a suicide note on his company’s website, expressing his love for his wife and holding her and her aunt responsible for his decision. The… pic.twitter.com/jkGh8Wx271
— IANS (@ians_india) March 7, 2025
आता निशांतची आई नीलम त्रिपाठी यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी 46 हजार महिलांना मदत केली. त्यापैकी 37 हजार महिलांना न्याय मिळवून देण्यात यश आले. मी हजारो महिलांना प्रशिक्षण दिले जेणेकरून त्या स्वावलंबी बनतील. मी आयुष्यात खूप संघर्ष केला, पण आज मी खचून गेले आहे. मला हे जीवन निरर्थक वाटत आहे. मला वाटले होते की, माझा मुलगा माझ्यावर अंतिम संस्कार करेल, पण काय झाले? माझी मुलगी प्राची हिलाच आपल्या मोठ्या भावाचे अंतिम संस्कार करावे लागले, असे त्यांनी म्हटले आहे.
वयाच्या 16व्या वर्षापासून 45व्या वर्षापर्यंत, मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पूर्ण उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे महिलांच्या हक्कांसाठी, समाजातील लिंगभेद आणि भेदभाव दूर करण्यासाठी समर्पित केला. वयाच्या 18व्या वर्षी, एका चळवळीदरम्यान पहिल्यांदा अटक झाली आणि नंतर असंख्य संघर्ष, चळवळी, न्यायासाठी लढा असे सुरूच राहिले. कधीच कुठल्या लोभाने काम केले नाही. मी बँक बॅलन्स वाढवला नाही किंवा कोणतीही मालमत्ता केली नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
माझी एकमेव संपत्ती म्हणजे लोकांचे प्रेम आणि आदर… जे देशात-परदेशात मिळाले. मी माझ्या दोन्ही मुलांना स्वतः वाढवले आणि मला त्याचा नेहमीच अभिमान होता. माझी दोन्ही मुले माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझा मुलगा निशांत माझा मित्र, सहकारी आणि सुखदु:खाचा वाटेकरी होता. तो माझी ताकद होता, ज्याने मला जगण्याची आणि काम करण्याची ऊर्जा दिली. पण माझे आयुष्य आता संपले आहे. माझा मुलगा निशांत मला सोडून गेला. वास्तवात, त्याने माझ्यावर अंत्यसंस्कार करायचे होते, पण मी माझ्या मुलावर “इको-मोक्ष” येथे अंत्यसंस्कार केले, असे त्यांनी म्हटले आहे. नीलम त्रिपाठी यांनी एयरपोर्ट पोलीस ठाण्यात निशांतची पत्नी अपूर्वा विरोधात दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्यायसंहितेच्या कलम 108 अन्वये FIR नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – Marathwada : मेरी संस्थेचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणारा, दानवेंची सभागृहात खंत