7 वर्षांच्या चिमुरडीसह आईने केली रेल्वेखाली आत्महत्या

आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच

palghar crime news woman commits sucide with daughter in saphale kelve railway station
7 वर्षांच्या चिमुरडीसह आईने केली रेल्वेखाली आत्महत्या
एका 7 वर्षाच्या चिमुरडीसह आईने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पश्चिम रेल्वेच्या सफाळे व केळवेरोड स्थानकादरम्यान घडली. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले.

तृप्ती आरेकर (३० वर्षे) असे आईचे नाव असून जिगीशा आरेकर (७ वर्षे, मुलगी) अशी मृतांची नावे असून त्या पालघर तालुक्यातील पोफरण (अक्करपट्टी) येथील राहणाऱ्या होत्या. मंगळवारी रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेनखाली त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना घटनास्थळी एका दुचाकीसह रुळामध्ये पडलेले आधार कार्ड व मोबाईल फोन आढळून आले. मात्र मोबाईलमधील सिम कार्ड आधीच काढून फेकून देण्यात आले होते. तर आधार कार्डवरील माहितीवरून त्यांची ओळख पटल्याने रात्री उशिराने सफाळे रेल्वे पोलीस ठाण्यात नातेवाईक पोहोचले.

दोघी मायलेकिनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सफाळे रेल्वे पोलीस त्याचा अधिक तपास करीत आहेत. तर या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ रोखून ठेवण्यात आल्या होत्या.


Elon Musk यांचा मोठा निर्णय; Twitter यूजर्सला आता ट्विटसाठी मोजावे लागणार पैसे