पनवेल : एक, दोन, तीन, चार नाही तर तब्बल 18 ऑटो रिक्षा पनवेल आणि परिसरातून वर्षभरात चोरील्या गेल्या होत्या. या चोरीचा केवळे संशयावरून अत्यंत कौशल्याने पनवेल शहर पोलिसांनी तपास केला. आणि तब्बल 17 रिक्षा चोरीचे गुन्हे उघड केले. महत्त्वाची बाब म्हणजे या रिक्षा पनवेल परिसरातून चोरून त्यांची बुलढाणा जिल्ह्यात विक्री केली जात होती. या प्रकरणी आरोपी निसार सत्तार खान (36) याला अटक केली आहे. या रिक्षांची किंमत 12 लाख 45 हजार रुपये आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, चंद्रशेखर चौधरी १० फेब्रुवारी रोजी रात्री गस्तीवर होते. त्यावेळी एकाची हालचाल संशयास्पद वाटली. त्यांनी त्याचा चक्क चार किलोमीटर पाठलाग करून ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याचे नाव निसार खान असल्याचे त्यांने सांगितले. तसेच तो पनवेलमधील कच्छी मोहल्ल्यात राहात असून मूळचा मेहकर, बुलढाण्यातील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी खोदून खोदून चौकशी केल्यानंतर त्याने पनवेल परिसरातील रिक्षा चोरल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे निसारने पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतून 10, कळंबोली पोलिसांच्या हद्दीतून 4 आणि कामोठी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातून 3 रिक्षा चोरल्याची कबुली दिली. एवढेच नाही या रिक्षा त्याने बुलढाणा तालुक्यातील मेहकर तालुक्यात विकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून मेहकरला पथक पाठवले आणि 18 रिक्षा पनवेलमध्ये आणल्या. यातील एका रिक्षेवरील इंजिन नंबर तसेच चासिस नंबर खोडल्याने या रिक्षाची चोरी कुठून झाली हे कळू शकलेले नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अशी करायचा चोरी
पनवेल परिसरास उभ्या असलेल्या रिक्षा निसार खान चोरायचा. त्या स्वतः चालवत बुलढाण्याला घेऊन जायचा. तिथे या रिक्षा 50 हजार रुपयांपर्यंत विकत असे. निसारने कर्ज घेतले होते. शिवाय त्याला जुगाराचाही नाद होता. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी तो रिक्षांची चोरी करायचा. याबाबत पोलिसांचा तपास सुरू होता, सीसीटीव्ही फुटेज तपासले जायचे. त्यामुळेच 10 फेब्रुवारीला गस्तीवरील पोलिसांनी संशयावरून निसारचा पाठलाग केला होता.
(Edited by Avinash Chandane)