Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमPen Crime News : पेण तालुक्यातील दूरशेत बनतोय क्राईम स्पॉट, यावेळी सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

Pen Crime News : पेण तालुक्यातील दूरशेत बनतोय क्राईम स्पॉट, यावेळी सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

Subscribe

पेण / अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील दूरशेत येथे सोमवारी सापडलेल्या एका सुटकेसमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दूरशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला एका सुटकेसमधून दुर्गंधी येत होती. त्यामुळे काहीतरी अघटीत घडल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी पेण पोलिसांना कळवले. पेण पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा त्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर सगळेच हादरून गेले आहेत. हा मृतदेह कुणाचा, या महिलेची हत्या कुणी आणि का केली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्याचवेळी दूरशेत बनतोय क्राईम स्पॉट बनत असल्याची चिंता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

हेही वाचा…  Pen News : रायगडमध्ये पालकमंत्रिपद वादात, भाजपचे संपर्कमंत्री वेगात, मूर्तिकारांच्या प्रश्नाच्या निमित्ताने आशिष शेलार सक्रिय

दुरशेत फाटा रस्त्यालगत नदीच्या कडेला काही दिवसांपासून एक मोठी सुटकेस पडून होती. ग्रामस्थांनी सुरुवातील तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. कुणीतरी जुनी बॅग फेकून दिली असेल, असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र, चार-पाच दिवसांनंतर या सुटकेसमधून दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांना संशय आला. ही माहिती त्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पेण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुटकेस उघडल्यावर समोर मृतदेह पाहून ग्रामस्थासोबत पोलीसही हादरून गेले. मृतदेह सडलेला असल्याने आठवड्यापूर्वी हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

हेही वाचा…  Sandeep Kshirsagar : शरद पवारांच्या आमदाराची तहसीलदाराला धमकी;  बीडमध्ये चाललंय तरी काय

दरम्यान, पोलिसांनी हा मृतदेह कल्पेश ठाकूर यांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून पेण उपजिल्हा रुग्णालय आणला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचा पोलिसानी संशय व्यक्त केला असून अधिक माहितीसाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. सुटकेसमधील मृतदेह प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत करत आहेत.

गंभीर बाब म्हणजे याच दूरशेत फाट्याजवळ चार-पाच महिन्यांपूर्वी एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. शिवाय बंदुकीच्या काही गोळ्या सापडल्या होत्या. आधीची आणि आताच्या घटनेमुळे स्थानिक चिंतीत झाले आहेत. या जागेवर सहज गुन्हे होतात किंवा गुन्हा पचवला जाऊ शकतो, असा चुकीचा मेसेज जाऊ नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

(Edited by Avinash Chandane)