Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमPritam Chakraborty : संगीतकार प्रीतमच्या कार्यालयात 40 लाखांची चोरी, ऑफिसबॉयला अटक

Pritam Chakraborty : संगीतकार प्रीतमच्या कार्यालयात 40 लाखांची चोरी, ऑफिसबॉयला अटक

Subscribe

बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या कार्यालयात दोन आठवड्यांपूर्वी 40 लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरी नेमकी कोणी केली? आणि चोर कोण आहे, याचा छडा लावण्यास पोलिसांना दोन आठवड्यानंतर यश आले आहे.

News By अरुण सावरटकर

मुंबई : बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती याच्या कार्यालयात दोन आठवड्यांपूर्वी 40 लाख रुपयांची चोरी झाली होती. ही चोरी नेमकी कोणी केली? आणि चोर कोण आहे, याचा छडा लावण्यास पोलिसांना दोन आठवड्यानंतर यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी संगीतकार प्रीतमच्याच कार्यालयात ऑफिसबॉय म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. मालाड पोलिसांकडून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आशिष सयाल असे या आरोपी कर्मचार्‍याचे नाव असून त्याच्याकडून सुमारे 38 लाखांची कॅश पोलिसांनी जप्त केली आहे. चक्रवर्ती हे बॉलीवूडचे एक नामांकित संगीतकार असून त्यांनी आतापर्यंत अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले आहे. (Pritam Chakraborty Officeboy arrested in case of theft of 40 lakhs )

मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार प्रीतम चक्रवर्ती हा गोरेगाव येथील रुस्तमजी ओझोनमध्ये कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. याच ठिकाणी त्याच्या मालकीचे एक म्युझिक स्टुडिओ सुद्धा आहे. याच म्युझिक स्टुडिओमध्ये आरोपी आशिष हा गेल्या सात वर्षांपासून ऑफिसबॉय म्हणून कामाला होता. 5 फेब्रुवारीला प्रीतमच्या कार्यालयात एका चित्रपट निर्मात्याने व्यवसायाचे सुमारे 40 लाख रुपये आणले होते. ही रक्कम त्याने मॅनेजर विनित चंद्रकांत छेडा यांच्या स्वाधीन करुन ती रक्कम प्रीतम चक्रवर्ती यांना देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ती कॅश एका ट्रॉली बॅगेत ठेवून ते काही कागदपत्रांवर सही घेण्यासाठी प्रितम यांच्या फ्लॅटमध्ये गेले होते.

हेही वाचा… Crime : बंदर परवाना ट्रान्स्फरसाठी मागितली लाच, मस्त्यव्यवसाय विभागाच्या दोन अधिकार्‍यांसह तिघांना अटक

याच दरम्यान आरोपी आशिषने ट्रॉली बॅगेसह आतील सुमारे 40 लाखांची कॅश घेऊन तेथून पळ काढला होता. हा प्रकार विनित छेडा यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कॉल घेतला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. आशिष 40 लाख रुपयांची रोकड घेऊन पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांनी मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या आशिषचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना आशिष हा जम्मू-काश्मीरला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने पळून गेलेल्या आशिषला जम्मू-काश्मीर येथून चोरीच्या कॅशसहीत शिताफीने अटक केली. त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे.