पुणे : जिल्ह्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. 25 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घडलेली ही घटना बुधवारी (ता. 26 फेब्रुवारी) उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे घटनेला 50 तास उलटून देखील या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याला फरार घोषित करण्यात आले असून त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पण पुण्यात या घटनेच्या चार दिवस आधीच एका महिलेसोबत परप्रांतीय कॅब चालकाने गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. (Pune Crime Misbehavior with a woman by cab driver)
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 21 फेब्रुवारीला सायंकाळी 7.30 वाजता कल्याणीनगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने घरी जाण्यासाठी कॅब बुक केली. यानंतर बुक करण्यात आलेली कॅब संगमवाडी रोडवर तिला घेण्यासाठी आली. महिलेने या कॅबमधून घराच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्यानंतर ही कॅब शहदवाल बाबा चौकात पोहोचली आणि संगमवाडी रोडमार्गे पाटील इस्टेट चौकाच्या दिशेने जाऊ लागली. तेव्हा या कॅब चालकाने आरसा महिलेचा चेहरा दिसेल असा सेट केला. यानंतर तो आरशात महिलेला पाहून चालत्या गाडीत अश्लिल कृत्य करू लागला. यामुळे पीडित महिला घाबरली. यावेळी महिलेने गाडी सिग्नलला थांबताच कॅबचा दरवाजा उघडून बाहेर पळ काढला. यानंतर महिलेने थेट खडकी पोलीस ठाणे गाठले आणि या प्रकरणी तक्रार दिली.
कॅबमधून महिलेने पळ काढल्यानंतर कॅब चालकाने पुढे जाऊन महामार्गावर गाडी एका बाजूला थांबवली आणि तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला. त्याआधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली. सुमित कुमार असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. आरोपी हा काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवड येथे स्थलांतरीत झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहा. पोलीस निरीक्षक चोरमोले यांनी दिली. मात्र पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत परप्रांतीय 20 वर्षीय कॅब चालकास अटक केली आहे.