पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुणे पोलीस दलातील अधिकाऱ्याने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील खडकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ तीन दिवसांपासून बेपत्ता होते. कुटुंबासह पोलीसदेखील त्यांचा शोध घेत होते. कार्यालयामध्ये त्यांनी काही सुचना न दिल्याने अनेक शंका उपस्थित करण्यात येत होत्या. अखेर लोणावळा येथील टायगर पॉईंटजवळ त्यांचा मृतदेह हा गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. (Pune Police sub inspector end his life by hanging at tiger point lonavla)
हेही वाचा : Murud News : मुरुडमधील रस्त्याबाबत पीडब्लूडीशी चर्चा निष्फळ, 17 फेब्रुवारीपासून उपोषणाचा निर्धार
समोर आलेल्या माहितीनुसार, अण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी नेमकी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गेल्या तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. कार्यालयामध्ये कोणतीही माहिती न देता गेल्यानंतर त्यांचा काहीही संपर्कही होत नव्हता. अशामध्ये शुक्रवारी (7 फेब्रुवारी) त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली. पोलिसांना 112 या क्रमांकावर एक फोन आला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह सापडला. यावेळी घटनास्थळी एक चारचाकी असल्याचेदेखील समोर आले आहे.
टायगर पॉईंटवर पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे. या गाडीमध्ये एक डायरी सापडली असून कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचे कारण लिहिलेले असू शकते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. अण्णा गुंजाळ यांनी आत्महत्या केल्यामुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयामधील ताणतणाव की कुटुंबातील तणाव? किंवा यामागे आणखी काही दुसरे कारण आहे का? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.