अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एका घटनेने खुद्द पोलीस देखील चक्रावले आहेत. दीड कोटीच्या दरोड्यातील तीन पोलिसांचा सहभाग आढळल्याने नक्की काय झालं, याची सर्वांनी उत्सुकता लागली आहे. दरम्यान रायगड पोलिसांनी पाचपैकी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त केले आहेत. तर पाचव्या आरोपीचा शोध सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी समाधान पिंजारी याने नागपूरमधील सोन्याचे व्यापारी नामदेव हुलगे यांना कमी पैशात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवले. शंकर कुळे याच्याकडे 7 किलो सोने असून ते 5 कोटी रुपयांमध्ये देतो, असे पिंजारीने हुलगे यांना सांगितले. एवढ्या स्वस्तात सोने मिळत असल्याने पाहून दीड कोटी रुपये घेऊन हुलगे, दीप गायकवाड आणि इतर मंडळी कारमधून अलिबागकडे निघाले. अलिबाग-पेण मार्गावर तिनविरा धरणाजवळ आल्यावर गायकवाडने कार थांबवली. पुढे पोलीस आले आहेत असे सांगितले. काही वेळात मोटरसायकलवरून पोलीस युनिफॉर्ममध्ये समीर परशुराम म्हात्रे आणि विकी सुभाष साबळे आले. त्यांनी गाडी तपासायची आहे, असे सांगून हुलगे आणि त्यांच्या सहकाऱ्याला गाडीतून उतरण्यास सांगितले. त्या दोघांनी पैशांची बॅग गाडीत ठेवली आणि ते गाडीतून बाहेर आले. ही घटना मंगळवारी (४ फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
हेही वाचा… Rahul Solapurkar : सोलापूरकरचे आणखी एक वादग्रस्त विधान, आव्हाड म्हणाले जिथे दिसेल तिथे जोड्याने मारा
सहकाऱ्यासह हुलगे गाडीतून उतरल्यानंतर दीप गायकवाड सुसाट वेगाने कार घेऊन पनवेलच्या दिशेने निघून गेला. त्याला पकडतो असे सांगून दोन्ही पोलीस मोटरसायकलने गाडीच्या मागून निघून गेले. या सर्व प्रकाराने हुलगे आणि त्यांचा सहकारी चक्रावून गेले. त्यानंतर हुलगे आणि त्यांचा सहकारी पोयनाडच्या दिशने चालत असताना पाठलाग करणाऱ्या पोलिसांची मोटरसायकल अलिबागच्या दिशेने जाताना दिसली.
याप्रकरणी हुलगे यांनी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, दुसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) एका हवालदाराने फिर्यादी हुलगे यांना 2 कोटी रुपये घेऊन तातडीने पोलीस ठाण्यात येण्याची धमकी दिली. त्यामुळे हुलगे यांनी 7 फेब्रुवारी रोजी रायगड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली. ही घटना कळताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यामध्ये समीर म्हात्रे, विकी साबळे, समाधान पिंजारी आणि दीप गायकवाड यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड कोटी रुपये जप्त केले आहेत. तर पाचव्या आरोपीला शोध सुरू आहे.
(Edited by Avinash Chandane)