Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeक्राइमRaigad News : ट्रिपल तलाक प्रकरणी रायगडमध्ये पहिला गुन्हा, महाडमध्ये नक्की घडलं तरी काय

Raigad News : ट्रिपल तलाक प्रकरणी रायगडमध्ये पहिला गुन्हा, महाडमध्ये नक्की घडलं तरी काय

Subscribe

अलिबाग : घरातील मंडळींनी तीन वेळा तलाक असे बोलून सुनेला तलाक देत तिचा मानसिक छळ केला आणि घराबाहेर हाकलून दिले. एवढेच नाही तर तिच्या पतीने गेल्या महिन्यात दुसरे लग्न केले. हे प्रकरण आहे महाड तालुक्यातील वहूर मोहल्ल्यामधील. आता या प्रकरणी पत्नीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नैना आणि अब्दुल रहमान इसाने यांचा निकाह 2022 मध्ये झाला. निकाह झाल्यानंतर काही दिवसांनंतर अब्दुल इसाने नोकरासाठी परदेशी गेला. त्यावेळी नैना सासरी राहात होती. असे असताना सासू आणि सासरे यांनी नैनाचा पैशांसाठी छळ सुरू केला. अब्दुलला व्यवसायासाठी 1 कोटी रुपये माहेरुन घेऊन ये, तसेच महाड तालुक्यातील बिरवाडीमधील वडिलांचा फ्लॅट अब्दुलच्या (नैनाचा पती) नावावर करण्यासाठी त्यांना सासू-सासऱ्यांनी तगादा लावला.

हेही वाचा…  Sanjay Raut on Suresh Dhas : धसांनी देशमुख कुटुंबीयांच्या अश्रूंचा बाजार केला, राऊतांचा गंभीर आरोप

याला नैना तयार नसल्याने ते तिला हाताबुक्क्यांनी मारहाण करायचे. त्यानंतर तलाक तलाक तलाक असे तीनवेळा बोलून तिला तलाक दिल्याचे सांगितले आणि तिच्याकडील दागिने ताब्यात घेऊन नैनाला घराबाहेर हाकलले. तत्पूर्वी तिचा प्रचंड छळ केला.

हे कमी म्हणून की काय, नैनाच्या नवऱ्याने म्हणजेच अब्दुलने गेल्या महिन्यात दुसरा निकाह केला. ही बाब नैनाला कळताच तिने पतीसह सासू-सासरे आणि इतर मंडळींविरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत पती अब्दुल इसाने, सासू निलोफर इसाने, सासरे नदीम इसाने तसेच सलीम इसाने आणि फिरदोस ऊर्फ गोमा जाकीर इसाने या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तोंडी तलाक बेकायदा असताना अब्दुलच्या कुटुंबीयांनी नैनाला तोंडी तलाक दिला आणि पहिली पत्नी असताना दुसरे लग्न केले. शिवाय पत्नीचा पैशांसाठी छळ या सर्व प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ट्रिपल तलाक प्रकरणात रायगड जिल्ह्यात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

भाजपा महिला जिल्हाध्यक्षा डॉ. मंजुषा, महामुणकर, बिरवाडी महिला शहरप्रमुख मानसी पवार यांच्या सहकार्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक इकबाल शेख आणि महिला पोलीस हवालदार एस. उमरटकर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

(Edited by Avinash Chandane)