अलिबाग : रायगड जिल्ह्यातील एका घटनेने सर्वांची चिंता वाढली आहे. विशेष करून पोलिसांची. कारण दोन आरोपींनी थेट पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. एवढेच नाही तर त्यांना धक्काबुक्कीही केली. हे कमी म्हणून की त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीला हात घातल्याने या आरोपींवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीसच करत आहेत. ही घटना रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या आवारात घडली.
काय आहे प्रकरण?
रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोर्ली ते साळाव तपासणी नाकादरम्यान एक टेम्पो वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशी पद्धतीने उभा केला होता. याची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी झीशान उलहक वसीम सातारकर आणि सर्वेश सुनील ठाकूर यांना त्यांनी समज दिली आणि दोघांना टेम्पो घेऊन पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
हेही वाचा… Sudhagad News : सुधागड तालुक्यातील जंगलात कुणी तरी आहे तिथं, वन विभागाच्या गस्ती पथकाला काय दिसलं
पोलीस ठाण्यात आणल्याच्या रागातून दोघांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच सहाय्यक फौजदार पिंपळे यांच्याशी वाद घातला. तसेच त्यांच्याशी अरेरावीची भाषा केली. त्यानंतर दोघांनी थेट पिंपळे यांच्या वर्दीला हात घातला. त्यांचा शर्ट खेचला आणि त्यांना हाताबुक्क्याने मारहाण केली. यामुळे पिंपळे थोडेफार जखमी झाले तसेच त्यांच्या मनगटावर खरटचले. तसेच झीशान उलहक वसीम सातारकर आणि सर्वेश सुनील ठाकूर यांनी पिंपळे यांच्या गणवेशावरील नावाची प्लेट, बटने तोडली. या गंभीर प्रकाराने सर्वजण अवाक् आले.
हेही वाचा… Suresh Dhas : कट्टर कार्यकर्ता खोक्याच्या अटकेची बातमी ऐकताच धस अण्णा म्हणाले…
या प्रकरणी दोघांविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघांविरोधात मारहाणा, सरकारी कामात अडथळा आणि इतर गुन्हे दाखल केले आहेत. 9 मार्चच्या मध्यरात्रीची ही घटना असून आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. आता या प्रकरणात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे अशा आरोपींविरोधात कोणती कठोर कारवाई करणार जेणेकरून भविष्यात कुणीही पोलिसांवर हात उगारण्याची हिंमत करणार नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Avinash Chandane)